आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाइल विश्‍व: वाहन विक्रीची गाडी पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीसारखा महत्त्वाचा सण असतानाही वाहन विक्रीच्या आघाडीवर दिग्गज कंपन्यांना घसरणीचे फटाके सहन करावे लागले आहेत. वाहन विक्रीच्या नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार मारुती-सुझुकी, ह्युंदाई, टीव्हीएस या आघाडीच्या कंपन्यांना फटका बसला आहे. तर होंडा, फोर्ड, यामाहा कंपनीच्या दारात मात्र तेजीचे अनार फुलले आहेत.
मारुतीच्या विक्रीत 10 टक्के घट : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकीला नोव्हेंबरमधील विक्रीत घसरणीचा फटका बसला आहे. कंपनीच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये 10.7 टक्के घट झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या 1,03,200 वाहनांची विक्री झाली होती, यंदा मात्र 92,140 गाड्यांची विक्री झाली. कंपनीच्या मिनी पॅसेंजर क्षेत्रातील कारच्या विक्रीत 3.7 टक्के वाढ झाली आहे. या सेग्मेंटमध्ये एम-800, अल्टो, ए-स्टार आणि वॅगन आर या कारचा समावेश आहे. कंपनीच्या कॉम्पॅक्ट कारच्या विक्रीत 24 टक्के घट झाली. यात स्विफ्ट, इस्टिलो आणि रिट्झ या कारचा समावेश आहे.
ह्युंदाईला घसरणीचा फटका : ह्युंहाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबरमधील वाहन विक्रीत 10.9 टक्के घट झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 55,762 वाहने विकली होती, यंदा मात्र 49,681 वाहनेच विक्री झाली. विक्रीतील घसरणीबाबत कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले, सणांचा हंगाम संपल्याचा हा परिणाम आहे. त्यातच बाजारातील आर्थिक स्थिती फारशी उत्तम नाही. ग्राहकांकडून चौकशीचे प्रमाणही कमी झाले आहे.
जनरल मोटर्सच्या विक्रीत घट : जनरल मोटर्स इंडियाच्या नोव्हेंबरमधील विक्रीत 14.14 टक्के घट झाली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या 7238 कार विक्री झाल्या होत्या. यंदा मात्र हे प्रमाण 6214 वर आले आहे. विक्रीबाबत कंपनीचे उपाध्यक्ष पी. बालेंद्र यांनी सांगितले, सणांमुळे थोडीशी वाढ दाखवून नंतर वाहन विक्रीची गाडी पुन्हा घसरणीच्या वळणावर आली आहे. बाजारातील आर्थिक घटक फारसे अनुकूल नाहीत. ऑटो क्षेत्र सध्या अत्यंत अडचणीच्या फे-यात अडकले आहे. जोपर्यंत सरकार ऑटो क्षेत्राला आर्थिक मदतीचे पॅकेज देत नाही तोपर्यंत या क्षेत्रात चैतन्य दिसणार नाही.
यामाहाच्या विक्रीत 28 टक्के वाढ : यामाहा मोटार इंडियाच्या नोव्हेंबरमधील विक्रीत 27.9 टक्के वाढ झाली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये यामाहाच्या 44,688 मोटारसायकल विक्री झाल्या, यंदा 57,160 मोटारसायकलींची विक्री झाली.
होंडाच्या विक्रीत मोठी वाढ
होंडा कार्स इंडियाच्या नोव्हेंबरमधील विक्रीत 151 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात कंपनीने 3711 कारची विक्री केली होती. यंदा मात्र कंपनीने 9332 कार विकल्या आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष जनेश्वर सेन यांनी सांगितले, अमेझ या कारला मिळालेल्या प्रतिसादामुळेच विक्रीतील हे झेप मारता आली. एप्रिल 2013 पासून अमेझला चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये 7,598 अमेझ कार विकल्या गेल्या.
होंडा मोटासायकलची विक्रीत धूम
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाच्या नोव्हेंबरमधील विक्रीत 43 टक्के वाढ झाली.
टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीला फटका
टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये 5.77 टक्के घट झाली.
अशोक लिलँडची विक्रीत घसरण
हिंदुजा समूहातील अशोक लिलँड कंपनीच्या नोव्हेंबरमधील वाहन विक्रीत 27.06 टक्के घट झाली.