आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम तांत्रिक दर्जामुळे बजाज डिस्कव्हर लोकप्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तांत्रिक दर्जा अबाधित राखल्यामुळेच बजाज डिस्कव्हर दुचाकी लोकप्रियतेच्या लाटेवर असल्याचे बजाजचे प्रादेशिक व्यवस्थापक (महाराष्ट्र) मिलिंद पेंढारकर यांनी सांगितले. सर्वसामान्य ग्राहकांची आवड-निवड आणि गरजा लक्षात घेऊनच ही दुचाकी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात तांत्रिक दोष असण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असेही ते म्हणाले.

अनेक देशी-विदेशी कंपन्यांच्या दुचाकी स्पर्धेत आहेत. तरीही बजाजने ग्राहकांची कायम पसंती मिळवली आहे. विशेषत: डिस्कव्हर 100 सीसी कमालीची लोकप्रिय आहे. यासंदर्भात पेंढारकर म्हणाले की, बदलत्या काळाची पावले ओळखून नव्या पद्धतीचे आणि लोकोपयोगी उत्पादन आणणे हेच बजाज कंपनीचे उद्दिष्ट आहे. मात्र, केवळ 100 सीसीची बाइक तयार करून ग्राहकांना देण्यापुरते आम्ही मर्यादित राहिलो नाही. तर ती कमी किमतीत कशी उपलब्ध होईल, याचाही विचार केला. बाइकवरील सफर अतिशय सुखकारक होईल. वेगावर नियंत्रण ठेवणारी गिअर आणि ब्रेकची यंत्रणा अत्याधुनिक कशी असेल यावरही भर देण्यात आला. त्यामुळे आज लाखो डिस्कव्हर ग्राहक अतिशय समाधानी आहेत. विजय पवार या औरंगाबादेतील ग्राहकाने ग्राहक मंचात केलेल्या तक्रारीबद्दल ते म्हणाले की, मुळात ही तक्रार बिनबुडाची आणि बनावट आहे.

पवार यांना कंपनीकडून दरवेळी प्रतिसाद देण्यात आला. वारंवार सर्व्हिसिंग करून देण्यात आली. मात्र, त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून डिस्कव्हरला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. डिस्कव्हरमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट नाही. आम्ही पवारच्या दुचाकीचे जॉब कार्ड अतिशय बारकाईने तपासले आहे. सानिया ऑटो सर्व्हिस सेंटरमधून त्याला मिळालेले पत्रही बनावट असावे, असा आमचा संशय आहे. सानियाच्या कर्मचार्‍यांकडून कदाचित त्यांना चांगली वागणूक मिळाली नसावी. त्यामुळे त्याचा राग त्यांनी कंपनीच्या उत्पादनावर काढला असावा, असेही पेंढारकर म्हणाले.