आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयकर बचतीसाठी बँकेतील मुदत ठेवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सेक्शन 80 सीच्या तरतुदीनुसार काही योजनांत गुंतवणूक करून आपण आयकरात बचत करू शकतो. त्यापैकी म्युचुअल फंडाच्या इएलएसएस योजना(इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम) व पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) या दोन योजनांची माहिती आपण घेतली. ईएलएसएस ही मार्केट लिंक्ड योजना आहे, तर पीपीएफ ही सुरक्षित योजना आहे. करबचतीसाठी आणखी एक सुरक्षित योजना म्हणजे बँकेच्या पाच वर्षांच्या मुदत ठेवी.बँकेशी आपला नित्याचा संबंध असतो. या अतिपरिचयामुळेच कदाचित आयकर वाचवण्यासाठी बँकेत मुदत ठेवीत पैसे ठेवणे या योजनेचा आपल्याला विसर पडत असावा.

करबचतीचा फायदा : बँकेत आपण अनेकदा मुदत ठेवीत रक्कम ठेवतो. या मुदत ठेवींची टर्म म्हणजे कालावधी सात दिवसांच्या वर सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे, पाच वर्षे असा कितीही असू शकतो. पण करबचतीचा फायदा फक्त पाच वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवींनाच मिळतो. सहसा जास्तीत जास्त कालावधी दहा वर्षे असतो.

त्यातही या मुदत ठेवी बँकेने खास टॅक्स सेव्हर म्हणून जाहीर केलेल्या असाव्या लागतात, तरच करबचतीचा लाभ मिळतो. या मुदत ठेवींची पाच वर्षे ते दहा वर्षांची मुदत म्हणजे लॉक-ईन असतो. मुदत पूर्ण झाल्याशिवाय ते पैसे काढता येत नाहीत. ती ठेव तारण ठेवून त्यावर कर्जसुद्धा घेता येत नाही. गुंतवणूक करताना रोकड सुलभता हा निकष महत्त्वाचा असतो. पण करबचतीच्या सर्वच योजनांमध्ये लॉक-ईन असतोच. सेक्शन 80 सीचा फायदा घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त एक लाख रुपयाची गुंतवणूक करू शकतो. इतर योजनांमध्ये काही गुंतवणूक केल्यानंतर या एक लाखापैकी बँक मुदत ठेवीत आपण एका वर्षी फार तर 50,000/- रुपये ठेवू. काही खूप अकस्मात संकट आले व आपल्याला या मुदत ठेवीतील रक्कमच अगदी हवी आहे, अशी शक्यता एकदम कमी असते. तेव्हा या पाच वर्षाच्या लॉक-ईनचा बाऊ करू नये.

पीपीएफचा महत्त्वाचा फायदा : सुरक्षिततेचा विचार करून ही मुदत ठेव सरकारी बँकात किंवा मोठ्या खासगी बँकात ठेवावी. ही संयुक्त नावाने ठेवता येते, पण कर सवलतीचा लाभ प्रथम नाव असलेल्या धारकासच मिळतो.या बँक मुदत ठेवीची पीपीएफबरोबर तुलना केली तर काय दिसते? पीपीएफचा महत्त्वाचा फायदा असा, की यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असते व यातील जमा असलेल्या रकमेवर सध्या 8.80 टक्के प्रतिवर्ष या दराने व्याज मिळते. उलट बँक मुदत ठेवीवर मिळणारे व्याज करपात्र असते व यावर सध्या 8.50 टक्के प्रतिवर्ष व्याज मिळत आहे. काही बँका 9 टक्के प्रतिवर्षही व्याज देत आहेत. तसेच वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का ते पाऊण टक्का जास्त व्याज मिळते. पण बँक मुदत ठेवींची जमेची बाजू म्हणजे, मुदत ठेवीत रक्कम ठेवताना जो व्याजदर निश्चित केलेला असतो, तो पाच वर्षांसाठी कायम राहतो. तो कमी-जास्त होत नाही. तर पीपीएफवर मिळणारा व्याजाचा दर दरवर्षी निश्चित केला जातो व तो कमी जास्त होत असतो. इथून पुढे तो कमी होण्याची शक्यताच अधिक आहे.

काही रक्कम इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवावी : पण ज्या नवीन ठेवी आपण ठेवू त्यासाठी तो दर लागू होईल. आज ठेवलेल्या ठेवींसाठी नाही. म्हणजेच व्याज दर आता कमी कमी होत जाणार असून त्याच्या आधीच आपण बँक मुदत ठेवीत रक्कम गुंतवावी. केवळ आयकर वाचवण्यासाठीच्या मुदत ठेवीत नव्हे तर इतरही अतिरिक्त रक्कम आपल्याला गुंतवायची असेल तर त्यासाठी हीच वेळ आहे. मात्र गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेली सर्वच रक्कम बँक मुदत ठेवीत गुंतवू नये. असेट अलोकेशनचे नियम/तत्त्व लक्षात घ्यावे. आपला कल, वय, आर्थिक स्थिती, धोका घेण्याची तयारी यानुसार काही रक्कम इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवावी. तिथे जोखीम असते, पण रिटर्नही जास्त मिळू शकतात. पीपीएफशी तुलना केल्यावर आणखी एक फरक असा, की पीपीएफमधील व्याज मुदतीअंती हातात येते. उलट मुदत ठेवीवरील व्याज आपण त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने घेऊ शकतो.


kuluday@rediffmail.com