आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Employee Strike News, Public Harass, Marathi, Divyamarathi

बँका बंद: कर्मचार्‍यांच्या संपामुळे दहा कोटी धनादेश ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बँकांचे विलीनीकरण, वेतनवाढ आदी विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रव्यापी संपामुळे बँकांचे व्यवहार कोलमडून पडले. देशातल्या 27 राष्ट्रीयीकृत बँकांच्या 90 हजार शाखांमधील आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. पहिल्याच दिवशी पाच कोटी रुपयांचे धनादेश वटू शकले नाहीत. येत्या दोन दिवसांत संपूर्ण देशभरात 7,40,000 कोटी रुपये मूल्याचे 10 कोटी धनादेश वटणे मुश्कील होणार आहे.
कोशागार व्यवहार, विदेशी विनिमय व्यवहार, चलन बाजार आदी ठिकाणी वटणावळीचे काम पहिल्या दिवशी पूर्ण बंद होते. हीच परिस्थिती उद्याही कायम राहणार आहे. त्यामुळे दोन दिवसांत 10 कोटींचे धनादेश वटू शकणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव विश्वास उटगी यांनी सांगितले. बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या या संपामध्ये 17 राष्ट्रीयीकृत बँका, 18 खासगी, 8 विदेशी बँका सहभागी झाल्या आहेत. अन्य संघटनांमध्ये अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघ, राष्ट्रीय बँक कर्मचारी महासंघ, भारतीय बँक कर्मचारी महासंघ, भारतीय राष्ट्रीय बँक अधिकारी काँग्रेस, राष्ट्रीय बँक कामगार संघटना, अखिल भारतीय बँक अधिकारी संघटना आणि राष्ट्रीय बँक अधिकारी संस्था सहभागी झाल्या आहेत.

ग्राहकांनी काय करावे
दोन दिवसांच्या संपामुळे सरकारी बँकांच्या एटीएममधील पैसे संपण्याची शक्यता आहे. तेव्हा खासगी बँकांच्या एटीएमचा वापर करावा.

या बँका सुरू राहणार
अॅक्सिस बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक व इतर खासगी बँका.

कर्मचार्‍यांच्या मागण्या
सरकारकडून 10 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. बँक कर्मचारी त्यावर समाधानी नाहीत. बँकेच्या कर्मचार्‍यांची 25 टक्के वेतनवाढीची मागणी आहे. नोव्हेंबर 2012 पासून बँक कर्मचार्‍यांची वेतनवाढ प्रलंबित आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, या बँका राहणार बंद..