आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Equity Share News In Marathi, Public Bank, Divya Marathi

बँक समभागांचा भरभरून परतावा, सार्वजनिक बँकांच्या शेअर्सला बहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीचा परिणाम आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर (पीएसयू) दिसतो आहे. फेब्रुवारीपासून बाजारात सुरू असलेल्या निवडणूकपूर्व तेजीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सर्वाधिक परतावा दिला आहे. याच काळात निफ्टीने 14 टक्के परतावा दिला असून त्या तुलनेत सीएनएक्स पीएसयू बँक इंडेक्समधून 45 टक्के परतावा मिळाला आहे.

सध्या सार्वजनिक बँकांचे समभाग भरभरून परतावा देत असले तरी काही दिवसांपूर्वी बाजारातील तज्ज्ञ याच समभागांबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त करत होते. मात्र, राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) सीएनएक्स पीएसयू बँक निर्देशांकाने फेब्रुवारीपासून आतापर्यंत 44.45 टक्के परतावा दिला आहे, तर याच काळात बँक निफ्टीने 31.55 टक्के रिटर्न दिले आहेत. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासूनची खराब कामगिरी हेच या बँकाच्या समभागांच्या चांगल्या परताव्यामागील कारण मानण्यात येत आहे. सोमवारी सीएनएक्स पीएसयू बँक इंडेक्स 3,015 या पातळीवर बंद झाला. फेब्रुवारीत हा स्तर 2,086 वर होता. बँक निफ्टीने तेव्हाच्या 9,944 अंकांवरून 13,081 पर्यंत मजल मारली आहे. असे असले तरी काही सार्वजनिक बँकांचे समभाग चांगला परतावा देण्यात अपयशी ठरले आहेत. यात युनायटेड बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक आदींचा समावेश आहे.

पीएसयू बँकिंगमध्ये समावेश असणा-या समभागांतही चांगली सुधारणा दिसून आली आहे. सर्वाधिक सुधारणा बँक ऑफ बडोदाने दर्शवली आहे. बँक ऑफ बडोदाच्या समभागांनी दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत 58 टक्के परतावा दिला आहे. चार फेब्रुवारी रोजी या बँकेचा समभाग 520 रुपयांच्या पातळीत होता. आता हा समभाग 820 या किमतीत आहे. याचप्रमाणे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या समभागाने 57 टक्के, तर युनियन बँक ऑफ इंडियाच्या समभागांनी 54 टक्के परतावा दिला आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेने 49 टक्के परतावा, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने 43 टक्के रिटर्न दिले आहेत. कॅनरा बँकेने 39 टक्के, तर बँक ऑफ इंडियाने 38 टक्के परतावा दिला आहे.
खासगी बँकांचा विचार केल्यास याच कालावधीत एचडीएफसी बँकेच्या समभागांनी 17 टक्के, तर आयसीआयसीआय बँकेच्या समभागांनी 38 टक्के वाढ नोंदवली आहे. येस बँकेसारख्या आकाराने छोट्या असलेल्या बँकेने 59 टक्के परतावा दिला आहे.

हे मात्र कमी पडले
फेब्रुवारी ते आतापर्यंतचा विचार केल्यास सार्वजनिक क्षेत्रातील युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक आदी बँकांनी लक्षणीय परतावा दिलेला नाही.

कोणी किती दिला परतावा
सीएनएक्स पीएसयू बँक इंडेक्स 44.45%
बँक निफ्टी 31.55 %
बँकांचे रिटर्न
बँक ऑफ बडोदा 58 %
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 57 %
युनियन बँक 54 %
पंजाब नॅशनल बँक 49 %
स्टेट बँक ऑफ इंडिया 43 %
कॅनरा बँक 39 %
बँक ऑफ इंडिया 38 %