आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोल्ड ईटीएफ’ना बॅँकांच्या सुवर्ण ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी - सेबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आणीबाणीच्या प्रसंगात चटकन पैशांची निकड भागवणारे आणि बचतीचा सुरक्षित मार्ग म्हणून घराघरांत नुसतेच पडून असलेल्या सोन्याचा वापर अधिक विधायक कारणासाठी व्हावा आणि पर्यायाने सोन्याच्या आयतीला वेसण बसावी या उद्देशाने भांडवल बाजार नियंत्रक सेबीने गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘गोल्ड ईटीएफ’ना बॅँकांच्या सुवर्ण ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

म्युच्युअल फंडांच्या गोल्ड ईटीएफला बॅँकाच्या सुवर्ण ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी सेबीने दिलेली असून त्यासाठी काही अटी निश्चित केल्या आहेत. सुवर्ण ठेव योजनांमधील एकूण गुंतवणूक ही अशा प्रकारच्या योजनांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी ही यातील एक मुख्य अट आहे.

घरगुती पातळीवर जवळपास 20 हजार टन सोने नुसतेच पडून असल्याचा रिझर्व्ह बॅँकेचा अंदाज आहे. या सोन्याचा वापर उत्पादक कारणासाठी करतानाच सोने आयातीच्या मागणीला चाप लावण्याचा रिझर्व्ह बॅँकेचा प्रयत्न आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे चालू खात्यातील तूट सध्या सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे.

नियम पाळावे लागणार
सुवर्ण ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याअगोदर म्युच्युअल फंडांना अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक मंडळ आणि विश्वस्तांकडून पूर्वपरवानगीसह गुंतवणुकीशी निगडित लिखित धोरण बनवावे लागेल, असे सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

फेरआढावा आवश्यक : कोणत्याही बॅँकेतल्या सुवर्ण ठेव योजनांच्या प्रत्येक गुंतवणूक प्रस्तावासाठी म्युच्युअल फंडांना आपल्या विश्वस्तांची पूर्वमान्यता घेण्याच्या दृष्टीने या धोरणात पुरेशी तरतूद करावी. तसेच म्युच्युअल फंडांनी वर्षातून किमान एकदा या धोरणाचा फेरआढावा घेणे गरजेचे असल्याचे ‘सेबी’च्या नियमावलीमध्ये म्हटले आहे.
डिमॅट स्वरूप : सुवर्ण ठेव योजनांमध्ये गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात बॅँकांकडून देण्यात येणारी सुवर्ण प्रमाणपत्रे ही डिमॅट स्वरूपात असावी, असेही या अध्यादेशात म्हटले आहे.