आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदार जामीनदार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उधार द्या, मदत करा, मात्र जामीन कुणालाही राहू नका : एक सुविचार सांगितला जातो की, एक वेळ उधार द्या, उसनवार द्या, प्रसंगी कुवतीप्रमाणे मदत करा व विसरून जा; पण जामीन कुणाला राहू नका. हे म्हणणे खरे आहे. याचे प्रत्यंतर हल्ली अनेकांना येत असते. सगळ्याच बॅँका हल्ली कर्जदारांनी दिलेले तारण कितीही लहान-मोठे असो, सर्रास सर्व कर्जव्यवहारांत जामीन घेतात. बॅँकांमध्ये जामीन घेण्याला दुसरी संरक्षणफळी म्हणतात. नेमक्या या म्हणण्याला-विचाराला खरे व योग्य मानत सामान्य लोक त्यांच्या नातेवाइकांना, ओळखीच्या व्यक्तींना, मित्रांना जामीन होतात. पण प्रत्यक्षात मात्र या दुसर्‍या संरक्षक फळीचाही दणका जामीनदारांना बसतो आणि आर्थिक फटका देऊन जातो.

जबाबदारी व त्यातून होऊ शकणारे परिणाम माहीत नसल्याने फसगत : हे असे का होते? हे होते. कारण बर्‍याच वेळा बरेच जण विचार न करता, समजून-उमजून न घेता जामीन राहतात. मुळात काही जणांना तर जामीनदार राहण्यातली जबाबदारी व त्यातून होऊ शकणारे परिणाम माहीत नसतात किंवा ते समजून न घेता जामीन राहतात. मग भविष्यात आपणच आपला सुखाचा जीव दु:खात घालतात. कित्येकांना जामीन राहणे म्हणजे ओळख देणे किंवा शिफारस करणे वाटते. त्यामुळे ते सहजपणे कुणालाही जामीन राहतात. याचा परिणाम असा होतो की, कर्जदाराने रक्कम थकवली की त्याच्या मागे सावकार, बँकेचा ससेमिरा सुरू होतो. त्यानंतर मग त्याचा उपयोग काही नसतो. मार्ग उरतो तो तोंड देण्याचा, पैसे भरण्याचा. कितीतरी जामीनदार झाल्याची किंवा जामीनदार म्हणून सही न केल्याची किंवा त्यांना फसवून कर्जदाराने वा बॅँकेने सह्या घेतल्याची भूमिका घेतात. असे वाटणे, म्हणणे, सांगणे संपूर्णपणे चुकीचेच असते. त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. जामीनदार म्हणून कायदेशीर आर्थिक जबाबदारी असते व ती पार पाडावी लागते.

कर्जवसुलीचा संपूर्ण अधिकार बॅँकेला जामीनदारानेच लिहून दिलेला असतो : काही जामीनदारांचा असा गोड गैरसमज असतो की सावकार, बॅँक ही कर्जदाराकडून कर्जवसुली करील व ते कर्ज त्याने भरले नाही तर सावकार, बॅँक, कर्जदाराने तारण दिलेली वस्तु, मालमत्ता, विक्री करेल व त्यातून कर्जवसुली करेल. हे झाल्यानंतर कर्ज पूर्ण वसूल झाले नाही तरच मग जामीनदारावर कर्जफेड करण्याची वेळ येईल. पण प्रत्यक्षात तसे करण्याची बॅँकेला गरज नसते.

कायद्याने जामीनदाराकडून कर्जवसुलीचा संपूर्ण अधिकार बॅँकेला जामीनदारानेच लिहून दिलेला असतो. असाच एक गैरसमज असतो की, जेवढे जामीनदार तेवढ्या प्रमाणात आर्थिक जबाबदारी विभागून एकेका जामीनदारावर असते. प्रत्यक्षात प्रत्येक जामीनदार संपूर्ण कर्ज फेडण्यास बांधील असतो. कुणालाही जामीन होताना या गोष्टी समजून घेतल्याच पाहिजेत.

बहुतेक बॅँका जामीनदारांच्या प्रॉमिसरी नोटेवर स्वाक्षरी घेतात व त्यांना सहकर्जदार करून घेतात : जामीनदार, शुअररी असा फरक असला तरी प्रत्यक्षात मात्र बहुतेक बॅँका, जामीनदारांच्या प्रॉमिसरी नोटेवर स्वाक्षरी घेतात व त्यांना सहकर्जदार करून घेतात. अशा सहकर्जदारांची जबाबदारी कर्जदाराइतकीच असते. संयुक्तरीत्या व स्वतंत्रपणे संपूर्ण कर्ज व त्यावरील व्याज भरण्याचे कर्जदार व जामीनदारांनी लिहून दिलेले असते व त्यामुळे सर्वांकडून किंवा कुणाकडून एकाकडून सर्व कर्ज व व्याजवसुलीचे पूर्ण अधिकार बॅँकांना प्राप्त झालेले असतात. काही जणांना असेही वाटते की, जामीनदार म्हणून भरलेली रक्कम नंतर कर्जदारांकडून वसूल करता येते. हो, हे खरे आहे. कायद्याने तो हक्क जामीनदारास जरूर आहे, पण त्यासाठी संबंधित कर्जदाराकडे ती आर्थिक ताकद असली पाहिजे व त्याची नियत सरळ असली पाहिजे. अन्यथा ही वसुली होत नाही, पण त्यासाठी खर्च मात्र होतो.

आपल्या पूर्ण परिचित माणसांना व त्यांची आर्थिक स्थिती व नियत लक्षात घेऊनच जामीनदार व्हावे : अशी सर्वसाधारण माहिती न करून घेता काही जण चांगल्या भावनेने, पण बेजबाबदारपणे जामीनदार होतात व नंतर कर्जदारांनी कर्जे थकवली की त्या जामीनदारांचा बँका कर्जवसुलीसाठी पिच्छा पुरवतात. प्रसंंगी कायदेशीर कारवाई करून कर्जवसुली करतात. मग ही मंडळी पश्चात्ताप करतात व बॅँकांना दोष देतात. याचा अर्थ जामीनदार होऊच नये असे नाही. पण जामीनदार होताना समजून-उमजून व्हावे. आपल्या पूर्ण परिचित माणसांना व त्यांची आर्थिक स्थिती व नियत लक्षात घेऊनच जामीनदार व्हावे. तो जे कर्ज काढणार आहे त्याचे तो काम करणार आहे व त्यात त्याला यश येण्याची शक्यता किती याचाही विचार करून जामीनदार व्हावे.