आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांतील रोख व्यवहारावर सॉफ्टवेअरची कडक नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बँकेत होणार्‍या प्रत्येक रोख व्यवहारावर प्रत्येक पायरीवर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करण्याची तयारी बँकांनी चालवली आहे. याशिवाय ग्राहक ओळखा (केवायसी) नियमांचे शाखा पातळीपासून ते मुख्यालयापर्यंत कडक पालन करण्यात येणार आहे.

बँकांतील रोख व्यवहार आणि केवायसीबाबत अनेक घोटाळे उघडकीस आल्यानंतर सरकारने या बाबत कडक उपाययोजना करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. याची अंमलबजावणी न झाल्यास उल्लंघनानुसार दंड आकारण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकारच्या गैरव्यवहाराबाबत कोणत्याच बँकेला माफी मिळणार नाही. पंजाब नॅशनल बँकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले, बँकेत प्रत्येक पातळीवर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर लावण्यात आले आहे. त्याद्वारे संशयित व्यवहाराची माहिती मिळेल. तसेच त्याची माहिती मुख्यालयातील डाटा बेसला आपोआप मिळेल आणि त्या खात्याबाबत रेड अलर्ट लागेल. अशा प्रकारच्या अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर सर्व बँकांकडून होणार आहे. याबाबत अनेक बँकांची सॉफ्टवेअर कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

रोख व्यवहार आणि केवायसीबाबत गय केली जाणार नसल्याचे सरकारने बँकांना बजावले आहे. वित्त सचिव आणि बँकांचे प्रमुख यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या एका बँकेच्या कार्यकारी संचालकाने सांगितले, रोख रकमांचा भरणा आणि काढणे यावर कडक नजर ठेवण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. एकाच दिवशी 49,999 रुपयांचा भरणा तसेच काढणे असे अनेक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्याशिवाय मोठय़ा रकमाचे कर्ज कार्पोरेट कंपन्यांऐवजी छोट्या खात्यांना प्राधान्य मिळायला हवे. कारण, बड्या कंपन्या सीडीआरचा गैरवापर करत आहेत. हे टाळण्यास तसेच वाढते अनुत्पादक खर्च (एनपीए) कमी करण्याची अंतर्गत प्रणाली चोख करण्याच्या सूचना सरकारने बँकांना केल्या आहेत.

सरकारचा आग्रह
0 ग्राहक ओळख (केवायसी) नियमांचे शाखा पातळीपासून ते मुख्यालयापर्यंत कडक पालन करण्यात येणार
0 संशयित व्यवहाराची माहिती देणारे सॉफ्टवेअर बँकेत प्रत्येक पातळीवर लावण्यात येणार आहे.
0 अंमलबजावणी न झाल्यास उल्लंघनानुसार दंडही आकारणार.