आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियामक बंधनांमुळे बँकांची प्रकृती ढासळणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॅसल 2 नियमांची पूर्तता, प्राधान्यकृत कर्जपुरवठ्याच्या मार्गदर्शक तत्त्वांत झालेली फेररचना, कर्ज पुनर्रचनेसाठी वाढीव तरतूद आदी विविध कडक नियमांमुळे बँकिंग क्षेत्राची आर्थिक प्रकृती ढासळत चालली आहे. याचा परिणाम म्हणजे बँकिंग क्षेत्राच्या नफ्याचे प्रमाण घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या कडक नियामक वातावरणाचा व्यवसाय आणि नफ्यावर होणा-या परिणामांवर मुख्य भर ठेवत बाजारातील विद्यमान स्थिती आणि बँकांचा मत्ता दर्जा, भांडवलीकरण यांचे मूल्यांकन करून ‘सध्याच्या नियामक वातावरणातील बँकिंग क्षेत्राची प्रकृती’ या विषयावर ‘सीआयआय’ने केलेल्या सर्वेक्षणात हा सूर व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राष्ट्रीयीकृत (5), खासगी (3) आणि विदेशी (7) अशा एकूण 15 बँकांचा समावेश आहे.

कर्जवृद्धी, निव्वळ व्याज उत्पन्न, करोत्तर नफ्यातील वाढ आणि समभागांवरील परतावा यासह बँकांच्या कामगिरीच्या अन्य काही मुख्य मापदंडांमध्ये घसरणीचा आलेख दिसून आल्याचे (सोबत दिलेले कोष्टक बघा) या सर्वेक्षणात म्हटले आहे. कडक नियामक गरजांच्या पूर्ततेमुळे या पुढील काळातही आपल्या आर्थिक प्रकृतीवर ताण आणखी वाढण्याची भीती या बँकांनी व्यक्त केली आहे.

विविध नियम पूर्ततांमध्ये ‘बॅसल 3’ नियमांच्या पूर्ततेसाठी भांडवली गरजांचा बँकिंग क्षेत्राच्या नफ्यावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यापाठोपाठ प्राधान्यकृत क्षेत्रासाठीच्या नियमांत झालेले फेरबदल, कर्ज पुनर्रचनेसाठी सर्वाधिक तरतुदीचे बंधन या दोन गोष्टींचादेखील नफ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बँकांनी व्यक्त केली आहे. कडक नियामक गरजांच्या पूर्ततेबरोबरच सर्वेक्षणातील बँकांचा मत्ता दर्जादेखील घसरत चालला आहे. बँकिंग क्षेत्राचे ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण अगोदरच सहा वर्षांच्या उच्चांकी (मार्च 2012 अखेर) पातळीवर गेले आहे. कर्ज फेररचना खात्यांमुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणात जवळपास 80 टक्के बँकांनी आपल्या निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण वाढणार असल्याचे, तर 88 टक्के बँकांनी कर्ज पुनर्रचना खात्यांचे प्रमाण चालू आर्थिक वर्षात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचाही बँकिंग क्षेत्राच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.