चंदिगड - सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग करा, परंतु जरा जपून. मोठ्या सवलतीमुळे ऑनलाइन शॉपिंगची वाढती क्रेझ पाहून बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे या कंपन्या आता फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि स्नॅपडील या सारख्या शॉपिंग साइटसपासून चार हात दूर जात आहेत.
सॅमसंग, एलजी,
सोनी, जिओनी आणि लॉयड या कंपन्यांनी
आपल्या वितरकांना अधिकृत पत्रक जारी केले आहे. फ्लिपकार्ट व तत्सम साइटसवरून उत्पादने खरेदी केल्यास सर्व्हिस किंवा वॉरंटी देण्याची जबाबदारी कंपनीची नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे. ग्राहकांनी आपल्या जोखमीवर अशा साइटसवरून खरेदी करावी, असे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. लॉयड कंपनीने स्नॅपडीलला नोटीस पाठवली असून त्यात कंपनीची उत्पादने विक्री करू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
दुसरीकडे फ्लिपकार्टच्या पीआर अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख पायल बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, ज्या कंपनीचे उत्पादन असेल तर सर्व्हिसही त्यांचीच राहील. प्रत्येक उत्पादनासाठी वॉरंटी काळ नमूद असतोच, त्यामुळे कंपन्या त्याला नकार देऊ शकत नाहीत.
कारण | खराब सेवा त्यांची, पत आमची जाते
ऑनलाइन विक्रीमुळे कंपनीची विश्वासार्हता कमी होत आहे. कारण उत्पादनाबाबत तक्रार असल्यास या कंपन्या सर्व्हिस देत नाहीत. - डी. जसरोटिया, नॅशनल हेड. एलजी एलईडी.
चलनातील अस्थैर्य आणि मार्केट डिस्टर्ब झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
- मार्केटिंग हेड, सॅमसंग
स्वस्तात खरेदीच्या नादात ग्राहकांना नंतर त्रास होऊ नये यासाठी जनहितार्थ सल्ला सादर केला.
- अरविंद व्होरा, नॅशनल हेड, जिओनी
सत्यता | रिटेलर्सकडून वाढता दबाव
* ई-शॉपिंगमध्ये अचानक वाढ झाल्याने मॉल्स आणि स्टोअर्समधून होणारी ग्राहकी ५० टक्क्यांनी घसरली असल्याचा दावा असोचेमने केला आहे.
* ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात शॉपिंग साइटसवरील विक्रीत २०० टक्के वाढ झाली आहे.
* गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा विक्रीत ३५० टक्के वाढ झाली आहे.
* ज्वेलरी, फूटवेअर, कपडे, असेसरीज आणि भेटवस्तू यांची विक्री पाचपटींनी वाढली आहे.
*
स्मार्टफोन आणि डेटा सर्व्हिसेजच्या विस्तारामुळे ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ झाली आहे.
* व्यवहाराची चांगली पद्धत, सोय आणि कॅश ऑन डिलिव्हरी यामुळे ग्राहकांत जास्त आकर्षण.
यंदा ऑनलाइन कंपन्यांच्या विक्रीत पाचपट वाढ झाली आहे. सवलत आणि वेळेवर घरपोच सेवा यामुळे ग्राहक सातत्याने तिकडे जात आहेत.
- डीएस रावत, महासचिव, असोचेम
दररोज दोन लाख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विक्री
अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या साइट्सवर भारतात दररोज सुमारे दोन लाख इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात. मॅन्युफॅक्चरर्सकडून सेवा देण्यास नकार दिल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ शकते.
१० ते १६ ऑक्टोबर दिवाळी धमाका ऑफर
फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलतीसह दिवाळी सुपर सेलची तयारी केली आहे. १० ते १६ ऑक्टोबर यादरम्यान दिवाळी धमाका या नावाने हे सेल सादर होणार आहेत. फ्लिपकार्टही मोठी ऑफर देण्याच्या तयारीत आहे.
विरोध पाहून अमेझॉन देतेय एक्स्टेंडेड वॉरंटी
अमेझॉनने बुधवारपासून फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि डिश वॉशर यांसारख्या उत्पादनांची विक्री सुरू केली आहे. कंपनी एक ते दोन वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी देत आहे. वार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी वाहतूक मोफत असेल.
ग्राहकांसाठी कायदेशीर सल्ला
ई-कॉमर्स संकेतस्थळावरून खरेदी केलेल्या वस्तूंवर कोणतीही कंपनी कायदेशीर वॉरंटी देण्यास नकार देऊ शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाइन खरेदी करते, तेव्हा दुकानात खरेदी केल्याप्रमाणेच त्याला कंपनी पॅकिंग मिळते. त्यात प्रॉडक्ट मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड असते. या कार्डच्या आधारे ग्राहक कायदेशीर रेमेडी मिळवू शकतो. - पंकज चांदगोठिया, ग्राहक व्यवहाराचे वकील