आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकीपूर्वी तपासा कंपनीचा वार्षिक अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीचा वार्षिक अहवाल म्हणजे अ‍ॅन्युअल रिपोर्ट कंपनीच्या शेअरधारकांना घरपोच मिळतो, पण आपल्याला गुंतवणूक करण्यापूर्वी हा बघायचा असेल तर तो कंपनीच्या वेबसाइटवर बघता येतो, डाऊनलोड करता येतो. तसेच एनएसई व बीएसई या स्टॉक एक्स्चेंजेसच्या साइटवर आणि मनीकंट्रोल इत्यादी गुंतवणुकीसंबंधीच्या साइटवरही अ‍ॅन्युअल रिपोर्ट किंवा त्याचा संक्षिप्त भाग म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट उपलब्ध असते. या अहवालात अकाऊंटिंग पॉलिसीज, बॅलन्सशीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट (इन्कम स्टेटमेंट), कॅश फ्लो स्टेटमेंट, लेखापत्रकासंबंधी टिपणे, ऑडिटरचा अहवाल, मॅनेजमेंटने व्यवसायाचे केलेले विश्लेषण व चर्चा अशा अनेक बाबी असतात. त्यामुळे हा अहवाल मोठा असतो, पण त्यातील महत्त्वाचा भाग आपण वाचला तरी पुरेसे असते.


मॅनेजमेंटने व्यवसायाचे केलेले
विश्लेषण व चर्चा नफा कळतो

सर्व प्रथम कंपनीच्या व्यवसायाविषयी माहिती वाचणे. मॅनेजमेंटने व्यवसायाचे केलेले विश्लेषण व चर्चा यात ही माहिती मिळते. कंपनीच्या व्यवसाय काय आहे याची सर्वसाधारण कल्पना असली तरी त्याची जास्त माहिती इथे मिळते. या नंतर कंपनीचे अ‍ॅसेट, लायबिलिटी व कॅपिटल याची माहिती बॅलन्सशीटमध्ये बघायला मिळते. मागील वर्षापेक्षा यात वाढ झालेली आहे का ते कळते. सहसा कंपनीचा नफा किती आहे यावर पटकन नजर टाकली जाते. पण एकूण उत्पन्न किती आहे, त्या प्रमाणात नफा किती आहे, त्यातील किती व्यवसायातून झाला आहे व किती इतर कारणामुळे झाला आहे, करपूर्व नफा व करोत्तर नफा किती हे बघणे गरजेचे आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये त्याची माहिती मिळते. तसेच यात अदर इन्कम अशी वर्गवारी असते म्हणजे कंपनीला तिच्या व्यवसायाशिवाय इतर कारणाने मिळालेले उत्पन्न. समजा औषध निर्माती कंपनी आहे तर तिच्या उत्पन्नाचा मुख्य भाग किंवा ऑपरेटिंग इन्कम हे त्या विक्रीतून आलेले असायला हवे. जमीन विकून तिला एका त्रैमासिकात जास्त उत्पन्न मिळालेले असेल, पण त्यावरून तिचा व्यवसाय उत्तम सुरू आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही.


खर्चाचा तपशील, फायनान्स, कर्ज,
बँक एनपीए, उत्पन्नाचा ब्रेकअप कळतो

खर्चाच्या तपशीलात ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहे, फायनान्स कॉस्ट किंवा कर्जावर द्यावे लागणारे व्याज किती आहे ते बघावे. समजा आपल्याला बँकिंग सेक्टरमधील शेअर घ्यायचे आहेत तर त्या बँकेचे एनपीए किती आहेत ते अहवालावरून कळते. रिअल इस्टेट हा जास्त जोखीम असलेला सेक्टर आहे त्यामुळे जास्त एक्सपोझर कंपनीसाठी नकारात्मक बाब आहे. तसेच कंपनीच्या उत्पन्नाचा तपशीलवार ब्रेकअप अहवालात दिलेला असतो. उदा: बँकिंग कंपनीचे जे उत्पन्न आहे त्यात ट्रेझरी, कॉर्पोरेट/होलसेल बँकिंग, रिटेल बँकिंग, इतर बँकिंग व्यवसाय या व्यवसायाच्या प्रत्येक विभागातून मिळालेल्या उत्पन्नाचा ब्रेकअप असतो. अहवालातून कंपनीचा इपीएस म्हणजे र्अनिंग पर शेअर किती आहे तेही कळते. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये कंपनीला व्यवसायातून व गुंतवणुकीतून किती रक्कम प्रत्यक्ष मिळली तसेच व्यवसायासाठी व गुंतवणुकीसाठी किती रक्कम प्रत्यक्ष खर्च झाली ते दाखवते.


अ‍ॅक्रूड इन्कम, कॅश फ्लो
स्टेटमेंटही पाहा

कंपनीच्या अकाउंटिंग पॉलिसीनुसार अ‍ॅक्रूड इन्कम म्हणजे कंपनीला मिळणार असलेले पण अजून न मिळालेले उत्पन्न हेही उत्पन्नात हिशेबात घेतले जाते, त्यावर आयकरही दिला जातो. या उलट कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये मात्र प्रत्यक्ष मिळालेली रक्कम हिशेबात घेतली जात असल्याने कंपनीला कॅशची काही समस्या आहे का ते यातून कळते. लेखा परीक्षकांचा अहवालही या अ‍ॅन्युअल रिपोर्टमध्ये असतो. कंपनीने सादर केलेली आकडेवारी अचूक आहे की नाही ते यात कळते. अ‍ॅन्युअल रिपोर्टमध्ये कंपन्या पाच वर्षांची संक्षिप्त आकडेवारी देतात. दर वर्षी कंपनीच्या व्यवसायाची वाढ कशी होत आहे किंवा अधोगती होत आहे त्याची यामुळे तुलना करता येते. टीपच्या भरवशावर शेअरची खरेदी करण्याऐवजी वार्षिक अहवाल वाचून स्वत: विश्लेषण करणे ही एक चांगली सवय!