आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्ज घेण्यापूर्वी लक्षात घ्यायच्या बाबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या स्वप्नातील घर खरेदीसाठी गृहकर्ज (होमलोन) हे एक माफक साधन आहे. शिवाय यातून करबचतही साधता येते. गृहकर्ज सहजरीत्या मिळावे तसेच त्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी काही बाबी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे काही पैसेही वाचवता येतील.

0 सखोल चौकशी करा : गृहकर्ज घेण्याचे निश्चित झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या गृहकर्जाची माहिती घ्या. त्यांचे नियम व अटी काय आहेत हे जाणून घ्या. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कर्जाविषयीच्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या.

0 ईएमआयकडे लक्ष द्या : कर्ज घेण्यापूर्वी आपल्या उत्पन्नाचाही विचार करा आणि किती ईएमआय (मासिक हप्ता) आपण सहज पेलू शकतो याकडे लक्ष द्या. अत्यंत विचारपूर्वक ईएमआय ठरवून घ्या. कारण ईएमआय चुकल्यास दंड भरावा लागतो, हे लक्षात ठेवा.

0 व्याजदराबाबत घासाघीस करा : बँका तसेच वित्तपुरवठा कंपन्या आपले व्याजदर नॉन-निगोशिएबल असल्याचे सांगतात. उच्च व्याजदरात काही प्रमाणात त्यांच्याकडून सवलत मिळण्याची शक्यता असते. मात्र, जेव्हा आपण घर पसंत केले आहे आणि लवकरात लवकर ते खरेदी करायचे आहे, अशा स्थितीत ही सवलत मिळू शकते. तसेच महिनाअखेर असेल तर काही फायदा होण्याची शक्यता असते. कारण विक्री प्रतिनिधीला त्याचे लक्ष्य पूर्ण करायचे असते. त्यामुळे अशा वेळी तो काही प्रमाणात सूट देऊ शकतो.

0 कर्ज पात्रता : कर्ज घेतेवेळी बँकेला जी कागदपत्रे द्यायची असतात त्यात क्रेडिट हिस्ट्रीचाही समावेश असतो. आपली कर्जाची पात्रता वाढवायची असेल तर क्रेडिट कार्ड तसेच कारसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळोवेळी करा. क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. कर्जाच्या कालावधीकडेही लक्ष द्या. दीर्घ काळासाठी जास्त पैसे भरावे लागतात. तसेच व्याज जास्त भरावे लागते हे लक्षात ठेवा.

0 अतिरिक्त शुल्क : विविध बँका कर्जासाठी किती प्रकारचे आणि किती शुल्क आकारतात याची माहिती असणे आवश्यक आहे. बँक बर्‍याच वेळा प्रशासकीय तसेच सेवा शुल्क आकारतात. हा शुल्काचा भार आपल्या कर्जाच्या खात्यात तुमच्या नावे जमा होत असतो, हे लक्षात घ्या.

0 सर्व अटी वाचून घ्या : कर्जाचे करारपत्र कितीही विस्तृत व किचकट असले तरी त्यातील अटी व्यवस्थित समजून घ्या. बँक अधिकारी काहीही सांगत असले तरी कागदावर जे लिहिले आहे त्यावर जास्त विश्वास ठेवा. त्यामुळे पुढील काळात फसवणूक होणार नाही, तसेच काही अडचण येणार नाही. करारपत्र वाचण्यासाठी आवर्जून वेळ काढा. कोर्‍या करारपत्रावर कदापि सही करू नका.


होमलोनसाठी अर्ज करणे कितीही सोपे असले तरी त्याबरोबर येणार्‍या अनेक अडचणी लक्षात घेणे गरजेचे असते. मनात काही शंका असेल तर बिनदिक्कत बँकेच्या अधिकार्‍याला विचारा व शंकेचे निरसन करून घ्या. अन्यथा पुढे चालून त्यामुळे नुकसान होऊ शकते. या सर्व बाबी लक्षात ठेवून गृहकर्ज उचला आणि मनातील घराचे स्वप्न पूर्ण करा.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com