आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Alternative For Investment In Instable Market

अस्थिर बाजारस्थितीत गुंतवणुकीचे उत्तम पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या अस्थिर वातावरणात अनेक श्रेणींची कामगिरी घसरली आहे. असे असले तरी गुंतवणुकीची काही साधने अशा स्थितीतही चांगला परतावा देत आहेत. अस्थिर व्याजदर आणि जी-सेक वर चांगली मिळकत ओपन एंडेड लाँग टर्म डेट साधनांसाठी वाईट ठरू शकते. मात्र, ज्या गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट दीर्घकालीन आहे अशांनी यात गुंतवणूक करावी. सद्य:स्थितीत गुंतवणुकीसाठी उत्तम ठरणारे पर्याय असे :


1. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन : यालाच एफएमपी असेही म्हणतात. हा बंद मुदतीचा (क्लोज एंडेड डेट) म्युच्युअल फंडप्रकार आहे. या योजना एका निश्चित कालावधीच्या आणि म्यॅच्युरिटीच्या असतात. या योजनांत म्युच्युअल फंड कंपन्या सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करते आणि ते मोठ्या कंपन्यांना, उद्योगांना कर्जरूपात देते. यासाठी बँका सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सीडी) आणि कंपन्या कमर्शियल पेपर (सीपी) जारी करतात. अशा रीतीने कंपन्या आणि बँकांसाठी एफएमपी हा निधी जमवण्याचा एक लोकप्रिय मार्ग बनला आहे. बाजारातील सध्याचे चढे व्याजदर पाहता अशा प्रकारच्या सीडी आणि सीपी आकर्षक व्याजावर उपलब्ध आहेत. डेट म्युच्युअल फंडावर लागणा-या कमी करामुळे बँक ठेवींच्या तुलनेत एफएमपी जास आकर्षक ठरत आहेत. यात इंडेक्सेशनच्या आधी दीर्घ काळासाठी भांडवली नफ्यावर 10 टक्के तर इंडेक्सेशनच्या नंतर 20 टक्के कर लागतो. लिक्विडीटीचा मुद्दा महत्त्वाचा नसेल, तर एफएमपी हे गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे. एफएमपीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्या की इन्फॉर्मेशन मेमोरेंडमची (केआयएम) पूर्ण माहिती घ्यावी. उच्च दर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले.


2. करमुक्त रोखे : हे दीर्घकालीन रोखे असतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग (पीएसयू) अशा स्वरूपाचे रोखे बाजारात आणतात. या रोख्यांना सरकारचा पाठिंबा असल्याने ते खात्रीशीर असतात. अशा प्रकारच्या रोख्यांना एजंसींकडून नेहमी उच्च दर्जा मिळत असतो. तसेच यावर मिळणारे व्याज प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10(15) (iv
)(h) नुसार करमुक्त असते. करमुक्त रोख्यांचे व्याजदर समान कालावधीच्या जी-सेक रोख्यांच्या दरांशी निगडित असतात. हे रोखे 10, 15 किंवा 20 वर्षांचे असतात. यांवर वर्षाकाठी मिळणा-या व्याजाचा वापर गुंतवणूक वा इतरत्र केल्यास करमुक्त रोखे हा पर्याय उत्तम ठरू शकतो.


3) अपरिवर्तनीय कर्जरोखे : नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर या नावाने सुपरिचित असणा-या या साधनाचा वापर कंपन्या सामान्य गुंतवणूकदार तसेच इतर कंपन्यांकडून कर्ज घेण्यासाठी करतात. यात कर्जरोख्यांना समभागांत परिवर्तन करण्याची मुभा नसते. तसेच मुदतीअंती रोखेधारकाला त्याची रक्कम परत मिळते. कार्पोरेट मुदत ठेवींच्या (एफडी) तुलनेत हा पर्याय अधिक सुरक्षित आहे. कंपनी बंद झाल्यास रोखेधारकांना प्राधान्याने पैसे परत केले जातात. सर्व सरकारी देणी दिल्यानंतर या रोख्यांची रक्कम परत केली जाते. यासाठी कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव टाळण्यासाठी रक्कम परत केली जाते. अशा रीतीने अपरिवर्तनीय रोखे गुंतवणूकदारांसाठी जास्त सुरक्षित आहेत. याला रेटिंग एजन्सी श्रेणीही देतात. उत्तम रेटिंग चांगल्या व्याजदराबरोबरच मूळ रक्कम परतीची हमी दर्शवत असते. यावर मिळणारे व्याज करपात्र असते त्यामुळे जे कमी प्राप्तिकराच्या कक्षेत असतात अशांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
आपल्याकडे जास्तीचा पैसा असल्यास या पर्यायांचा गुंतवणुकीसाठी अवश्य विचार करावा. म्हणजेच सर्व वित्तीय उद्दिष्टांनुसार असेट अलोकेशन झाल्यानंतर जास्त रक्कम शिल्लक असेल तर त्यासाठी ही साधने उत्तम आहेत.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.