आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही तरुण असाल तर साहजिकच तुमच्या अनेक अपेक्षा असतील. करिअरमध्ये लवकरात लवकर प्रगती होऊन जीवनात जास्तीत जास्त सुखसोयी असाव्यात, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी जेवढे कमावता तेवढा खर्च करण्यास मागे-पुढे पाहत नाही. तसेच आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्यासही कचरत नाही. तुम्हाला वाटत असते की काळ आपल्याबरोबर आहे. अशा स्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीकडे दुर्लक्ष होते. मात्र, असा दृष्टिकोन योग्य नाही. महागाई आणि कराचा बोजा लक्षात घेता असे दुर्लक्ष अक्षम्य आहे.
नोकरी लागल्यापासूनच किंवा करिअरच्या प्रारंभापासूनच गुंतवणुकीला प्रारंभ करणे केव्हाही चांगले. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला फायदा मिळतो. मात्र, अनेक युवक गुंतवणुकीच्या योग्य साधनांबाबत संभ्रमावस्थेत असतात. त्यातून अनेक जण जास्त परताव्याचे आमिष दाखवणा-या योजना निवडतात. ज्या योजना गरजेच्या नसतात अशा योजनांत निष्कारण गुंतवणूक होते.
युवकांनी नेमकी कोठे गुंतवणूक करावी व कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी :
1. शेअर : दीर्घकालीन गुंतवणुकीत शेअर्सकडे दुर्लक्ष करून चालत नाही. महागाईचा फारसा प्रभाव न पडणा-या व चांगला परतावा देणा-या दीर्घकालीन साधनात शेअरचा समावेश होतो. कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिबिंब समभागांत उमटत असते. शेअरमध्ये थेट गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, त्यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक असते. त्यातील सखोल ज्ञान हवे. तसेच जवळ चांगले भांडवलही हवे. अशा प्रकारे म्युच्युअल फंड हाही एक चांगला मार्ग आहे. कमी भांडवलातही शेअर बाजारात उतरता येते. चांगल्या फंड योजनेची निवडही आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाइन शोध घेता येतो. व्यावसायिक सल्लागाराची मदतही घेता येते.
2. डेट : तरुणांची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे एका मर्यादित कक्षेत गुंतवणूक करून भागत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांत गुंतवणूक करणे गरजेचे ठरते. अशा परिस्थितीत डेट इंस्ट्रूमेंट्स महत्त्वाची भूमिका निभावतात. यात तुलनेने स्थैर्य जास्त असते. आपल्यावर अवलंबून असणारे आणि जोखमीची क्षमता यावर डेटमधील गुंतवणूक अवलंबून असते. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या डेट योजनेतील गुंतवणूक आपल्या उत्पन्नावर लागणा-या करावर अवलंबून असते, तर काही साधने सर्व श्रेणीसाठी उत्तम असतात. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) हे अशा लघु योजनेचे उत्तम उदाहरण आहे. याद्वारे आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चांगली मदत मिळते. ईपीएफ तर सुरूच असते. उत्पन्न जसे वाढते तसे यातील गुंतवणूक वाढत जाते. यामुळे निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम हाती पडू शकते. एफडी आणि आरडी ही अल्पकालीन गुंतवणुकीची उत्तम साधने आहेत. आपल्या कर नियोजनानुसार पोर्टफोलिओतील यांचा समावेश अवलंबून असतो. कर बचतीचा विषय असेल तर डेट म्युच्युअल फंड हाही एक चांगला पर्याय आहे.
3. विमा : तुम्ही तरुण आहात, त्यामुळे बँक, एजंट किंवा एखाद्या मध्यस्थाकडून विमा गुंतवणुकीचा आग्रह झाला असेलच. यात दुहेरी लाभ आहे. एक तर कर वाचतो आणि बाजारात पैसाही लावता येतो. मात्र, हे फारच आदर्श आहे असे म्हणता येत नाही. कोणतीही कॉम्बो योजना महाग असतेच. तसेच आपल्या गरजांची पूर्तता याद्वारे होईल हे निश्चित सांगता येत नाही. तुमच्यावर कोणी अवलंबून नसेल आणि फारशा जबाबदा-या नसतील तर कमी वयात विमा उतरवण्याची फारशी गरज नाही. अशा स्थितीत अशा लालूच दाखवण्या-या योजनांत अडकू नका आणि गुंतवणूक नेहमी थेट व सरळ ठेवा.
4. सोने : हे गुंतवणुकीचे पारंपरिक साधन आहे. प्राचीन काळी हे गुंतवणुकीचे साधन नसून व्यापाराचे साधन होते. परताव्याचा लोभ तुम्हालाही सोन्याकडे खेचू शकतो. मात्र, सोन्यातील गुंतवणुकीचे काही फायदे - तोटे आहेत. ते समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ परताव्याच्या दृष्टीने सोन्यात गुंतवणूक करणे योग्य नाही. संकटकाळात महागाईपासून वाचण्यासाठी सोन्याचा उत्तम वापर करता येतो. त्यामुळेच आपले आई-वडील भौतिक स्वरूपातील सोने खरेदीला प्राधान्य देतात. मात्र, भौतिक स्वरूपातील सोने खरेदीपेक्षा कॉस्ट इफेक्टिव्ह मार्गाचा अवलंब करणे केव्हाही चांगले. आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 5 ते 10 टक्क्यांहून जास्त गुंतवणूक सोन्यात नसावी.
ही गुंतवणुकीची मूलभूत साधने आहेत. तरुण तसेच संभ्रम असणा-यांनी यात गुंतवणूक करावी. यात खूप मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकताही नसते. तसेच ही साधने सुलभ आहेत. या साधनांबाबत सखोल माहिती घेतल्यास यातील गुंतवणुकीबाबत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. समजा निवड करणे अवघड वाटत असेल तर व्यावसायिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता. या सल्ल्यासाठी प्रारंभी काही प्रमाणात शुल्क द्यावे लागले तरी आगामी काळातील नुकसानीपेक्षा शुल्क देणे केव्हाही परवडणारे ठरते.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
jp.solanki@dainikbhaskargroup.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.