आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदीची ‘सुवर्ण’संधी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लग्नसराई हंगामाच्या तोंडावरच सोन्याच्या किमती आपटल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे; परंतु हा दिलासा तात्पुरता असून आणखी दोनच दिवस हा घसरणीचा कल राहून पुन्हा तेजी परतणार आहे. सोने खरेदीची हीच सुवर्णसंधी असल्याचे मत सराफ बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोने आणि चांदी दोन दिवसांत खरेदी करू शकता. परत तेजी येऊन सोने 2000 रुपयांनी आणि चांदी 5 हजार रुपयांनी वाढेल. विदेशी बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्याचा फायदा उठवत साठेबाजांनी केलेल्या तुफान विक्रीमुळे दहा ग्रॅम सोन्याचा भाव 1 हजार 250 रुपयांनी घसरून तो 28 हजार 350 रुपयांवर आला. गेल्या वर्षीच्या 7 एप्रिलनंतर प्रथम सोन्याच्या भावाने वार्षिक नीचांकी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव सध्या 30 हजार रुपयांच्या खालीच घुटमळत आहे.

न्यूयॉर्क बाजारात चांदी प्रतिऔंस 6.54 टक्क्यांनी घसरून 25.85 डॉलरवर आली. साठेबाजांनी चंदेरी धातूची विक्री केल्यामुळे चांदीचा भाव लक्षणीय 2,500 रुपयांनी घसरून 50 हजार 100 रुपयांवर आला. औद्योगिक तसेच नाणी बनवणार्‍यांकडून मागणी कमी झाल्याचा परिणामदेखील चांदीच्या किमतीवर झाला आहे.

येणार्‍या दोन दिवसांत दहा ग्रॅम सोन्याचा भाव आणखी कमी होऊन तो 28 हजार 300 रुपयांपर्यंत आणि एक किलो चांदीचा भाव 49 हजार रुपयांवर येण्याचा अंदाज आहे. पुढच्या दोन दिवसांत सोने 150 रुपयांनी तर चांदी 500- 700 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी पुढचे दोन दिवस म्हणजे सोने खरेदीची एक प्रकारे सुवर्णसंधीच असल्याचे मत बुलियन तज्ज्ञ अश्विन देरासरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. ही तात्पुरती मंदी असून सोने 22 हजार आणि चांदी 45 हजारांपर्यंत घसरण्याची अजिबात शक्यता नाही. असे ठाम मत देरासरी यांनी व्यक्त केले.


पुढे काय ?
उत्तर कोरियाकडून मिळणारे युद्ध संकेत, सायप्रसने सोने विक्रीचा व्यक्त केलेला मनोदय या मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तसेच चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. अशा स्वरूपाची घसरण तात्पुरती असते. गुंतवणूकदारांनी ‘बाय आॅन डीप’ या सूत्रानुसार आपल्या कुवतीनुसार खरेदी करावी. काही काळानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. त्यानंतर सोने-चांदीत तेजीचे संकेत आहेत.’’ विश्वनाथ बोदाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, आनंद राठी शेअर्स ब्रोकर्स

सोन्याच्या किमती घसरण्याची कारणे
० युरोपमधील सायप्रसकडून आर्थिक पेचप्रसंग सोडवण्यावर उपाय म्हणून कर्ज परतफेड करण्यासाठी सोने विक्रीचे संकेत
० अमेरिकेच्या फेडरल बॅँकेने बेरोजगारी तसेच ग्राहक खर्चाचे प्रमाण गेल्या महिनाभरात सुधारल्यामुळे आर्थिक साहाय्य योजनेवर फेरविचार करण्याचे केलेले वक्तव्य.
० ग्राहकांच्या ठेवींवर यापुढे व्याज द्यावे की नाही याबद्दल अमेरिकेतल्या बँकांचा सुरू असलेला विचार
० इतर सर्व चलनांच्या तुलनेत मजबूत झालेला डॉलर