आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या रोजगारासाठी महिलांना कर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन भारतीय महिला बँक (बीएमबी) बँकिंग आणि आर्थिक सेवा देत असून महिला ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज वाजवी व्याजदरात देणार असल्याचे महिला बँकेच्या अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापक उषा अनंतसुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले. चंदिगड येथे महिला बँकेची 10 वी शाखा उघडण्यात आली.

त्यांनी सांगितले, नोकरी करणार्‍या महिलांची अडचण दूर व्हावी यासाठी बँकेने डे केअर सेंटर स्थापन करणार्‍यांसाठी विशेष कर्ज योजना सादर केली आहे. तर सर्वसाधारण बँक कर्ज उत्पादनात वाहनकर्ज, गृहकर्ज यासह शैक्षणिक कर्ज, ब्यूटी पार्लरसाठी कर्ज, केटरिंग केंद्रासाठी कर्ज आदी कर्ज उत्पादने महिलांच्या खास गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. मोठ्या शहरांनंतर देशातील छोटी शहरे तसेच गावांत बँकेच्या शाखा उघडण्यात येतील.

बचत खात्यावर 4.5 ते 5 टक्के व्याज
एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असणार्‍या खात्यावर महिला बँक सध्या पाच टक्के आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असणार्‍या खात्यांवर 4.50 टक्के व्याज देत आहे. एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त जमा रकमेवर 9.15 टक्के व्याज आहे.

महिल बनाव्यात कारच्या मालकीण
बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले, महिलांना कार खरेदीसाठी 90 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा देणार्‍या कंपनीच्या शोधात सध्या महिला बँक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना स्वत:च्या कारची मालकीण बनता येईल. सध्या अशी स्थिती फारच क्वचित आढळते.

2020 पर्यंत 16000 कोटींच्या व्यवसायाचे लक्ष्य
महिलांचा आर्थिक विकास आणि देशाच्या विकासातील वाटा निश्चित करण्याच्या उद्देशाने सरकारकडून 1000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भागभांडवलासह स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकेने 2020 पर्यंत 16000 कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणार महिला बँक
भारतीय महिला बँकेच्या अध्यक्ष उषा सुब्रमण्यम यांनी सांगितले, मोठ्या शहरांनंतर देशातील छोटी शहरे तसेच गावांत बँकेच्या शाखा उघडण्यात येतील. मार्च 2015 पर्यंत बँकेच्या 80 हून जास्त शाखा उघडण्यात येतील. यातील पन्नास टक्क्यांहून जास्त शाखा ग्रामीण भागात तसेच छोट्या शहरांत असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 25 टक्के शाखा ग्रामीण भागात उघडण्यात येतील. सध्या प्रत्येक राज्यात एटीएमसह एक शाखा उघडण्याचे बँकेचे धोरण आहे. यामुळे बँकेसह एटीएमची सुविधा ग्रामीण भागात पोहोचणार आहे. बँकेकडून महिलांना अद्ययावत सेवा पुरवण्यावर भर देणार आहे.