आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईवर मात करू शकत नाहीत नेहमीच्या बचत योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईमुळे सामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या घर, विवाह, उच्चशिक्षण यासह सर्वच छोट्या-मोठ्या गरजा पुरवणे कठीण होत चालले आहे. साहजिकच यापूर्वी दर महिन्याला शिल्लक पडणारी रक्कम बचत किंवा गुंतवणूक योजनांत जात होती, ती कमी करावी लागत आहे. नेहमीच्या बचत योजना या महागाईवर मात करू शकत नाहीत, हेही उघड सत्य आहे. नोकरदार लोक ज्या उद्योगधंद्यांमध्ये काम करतात त्या उद्योगांनाही महागाईमुळे फायदा मिळवणे कठीण झाल्याने नजीकच्या भविष्यात पगारवाढ, बोनस मिळणेही कठीण होणार आहे. एकूणच या कठीण काळात महागाईवर मात करण्यासाठी खर्च कमी करण्याबरोबरच उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे गरजेचे बनले आहे.

० सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय : आतापर्यंत अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरक्षित मानल्या गेलेल्या सोने आणि जमीन या पर्यायांमध्ये लोक गुंतवणूक करत होते. मात्र, गगनाला भिडलेल्या जमिनीच्या भावांमुळे हल्ली जमीन वा स्थावर मालमत्ता खरेदी करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सोन्याचा भाव डॉलरमधील भावाच्या उच्च पातळीवरून काहीसा खाली आला असला, तरी रुपयाच्या घसरलेल्या किमतीमुळे भारतीयांसाठी मात्र सोने त्या प्रमाणात स्वस्त झालेले नाही. त्यातच सरकारकडूनही सोने आयातीवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न होत असल्याने सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात पडलेला आहे.
० उच्च व्याजदर, अडचणीतले उद्योग, रुपयाची उलथापालथ व अस्थिर शेअरबाजार : उच्च व्याजदर आणि त्यामुळे अडचणीत असलेले उद्योगधंदे आणि रुपयामधील उलथापालथीने शेअरबाजारातही अस्थिरता पाहायला मिळत आहे. कमोडिटी बाजारातील अलीकडेच उघडकीस आलेल्या घोटाळ्यामुळे एकूणच वातावरण गढूळ बनले असून अनुभवी व कसलेले गुंतवणूकदारही आत्मविश्वास गमावत आहेत. सन 2014 मध्ये होणा-या निवडणुकांपर्यंत असेच अनिश्चित वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. एस.आय.पी. योजना दीर्घ कालावधीसाठी फायदेशीर ठरत असल्या, तरी त्याही शेवटी शेअरबाजारावर अवलंबून असल्याने जेव्हा देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीबद्दलच शंका उत्पन्न होते, तेव्हा त्याबद्दलही आशा बाळगणे कठीण होत जाते. ज्या थोड्या भारतीयांना परदेशातील नोकरी वा धंदे याद्वारे डॉलर वा तत्सम मजबूत विदेशी चलनांमध्ये उत्पन्न मिळते, त्यांचे रुपयामध्ये रेमिट होणारे उत्पन्न हे रुपयाच्या घसरणीमुळे वाढल्यासारखे दिसत असले, तरी तेही फसवे असून भारतातील वाढलेल्या महागाईमुळे हे वाढीव उत्पन्न खर्च होऊन जाणार असते.
० निर्यात प्रधान कंपन्यांचे शेअर्स : अशा परिस्थितीत नेहमी सुचवला जाणारा पर्याय म्हणजे, ज्या कंपन्यांचे उत्पन्न हे डॉलरमध्ये येते अशा म्हणजेच आपली उत्पादने वा सेवांची निर्यात करणा-या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा होय. अलीकडच्या काळात आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये, रुपयाच्या तुलनेत महाग झालेल्या डॉलरमुळे वाढ झालेली दिसून येत आहे. उदा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 1500 रुपयांच्या आसपास उपलब्ध असणारा टाटा कन्सल्टन्सीचा शेअर ऑगस्टमध्ये 2000 रुपयांवर पोहोचला. इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा अशा इतर आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही अशीच तेजी दाखवत आहेत. जेव्हा जेव्हा डॉलर वधारतो, तेव्हा असेच चित्र दिसत असते. त्यामुळे एक प्रकारे रुपयाच्या घसरणीवर मात करण्यासाठी अशा कंपन्यांचे शेअर्स आपल्या पदरी असणे गरजेचे आहे. औषधी क्षेत्रांतील म्हणजेच फार्मा कंपन्यांमध्येही अशी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, औषधांच्या मार्केटिंगमधील विविध देशांची धोरणे आणि त्यांचे परवाने यांचा या कंपन्यांच्या शेअर्सवर उलटसुलट परिणाम होत असतो.
वधारणारा डॉलर व त्यातील थेट गुंतवणूक
वधारणा-या डॉलरचा फायदा उठवून भारतातील महागाईवर काही अंशी मात करण्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये थेट गुंतवणूक करणे सामान्य भारतीयांना शक्य नसले, तरी एक पर्याय भारतातील गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. तो म्हणजे भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसवर ‘एन 100’ नावाने उपलब्ध असणारा ‘ईटीएफ’ होय. ‘एन 100’ म्हणजे अमेरिकेच्या नॅसडॅक-100 या निर्देशांकावर आधारित असलेला ईटीएफ असून सर्वसाधारणपणे अमेरिकन शेअरबाजार आणि त्या देशाचे चलन हे समांतर वाढ दाखवण्याची शक्यता असल्याने नॅसडॅक-100 डॉलरप्रमाणेच वधारत असतो. या अमेरिकन इंडेक्समध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर - सॉफ्टवेअर, टेलिकम्युनिकेशन्स, रिटेल ट्रेड आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील मोठ्या आकाराच्या अमेरिकन तसेच आंतरराष्‍ट्रीय स्तरावर काम करणा-या कंपन्यांचा समावेश आहे. या इंडेक्समध्ये प्रामुख्याने अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, गुगल यांसारख्या आंतरराष्‍ट्रीय कंपन्यांचा समावेश मात्र नाही. अशा प्रकारे अमेरिकन शेअरबाजारावर आधारित अशा भारतातील पहिल्या ईटीएफची स्थापना मोतीलाल ओसवाल या भारतीय ब्रोकरेज कंपनीतर्फे करण्यात आल्याने भारतीयांना अमेरिकन शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला झाला. या कंपन्या विविध क्षेत्रांत काम करत असल्याने आपली गुंतवणूक स्थिरतेच्या दृष्टीने विश्वासार्ह आहेच, शिवाय भविष्यातही उत्तम कामगिरी करण्याची शक्यता असल्याने आपली गुंतवणूक चांगली वाढही दाखवू शकते.