आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांच्या परवान्यासाठी बडे उद्योगसमूह सरसावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नव्या बँकांच्या परवान्यासाठी देशातील बडे उद्योगसमूह सरसावले आहेत. अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटल यासाठी जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकेशी व निप्पॉन लाइफशी भागीदारी करणार आहे. रिलायन्स शिवाय रेलिगेअर एंटरप्रायजेझ, आदित्य बिर्ला समूह, जे. एम. फायनान्शियल, टीएफसीआय आणि टाटा समूहासह इतर कंपन्या नव्या बँकांसाठी इच्छुक आहेत.
जपानच्या वित्तीय क्षेत्रातील या दोन कंपन्या रिलायन्स कॅपिटलमध्ये 4 ते 5 टक्के भागीदार होऊ शकतात. सध्या बँकेतर वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असणारी रिलायन्स कॅपिटल (आर कॅप) प्रस्तावित बँकेची मुख्य प्रवर्तक राहील, असे रिलायन्स कॅपिटलने बुधवारी स्पष्ट केले. बँकेच्या परवान्यासाठी आर कॅप लवकरच रिझर्व्ह बँकेकडे अर्ज करणार आहे.
सुमितोमो मित्सुई जपानमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी आहे. निप्पॉन लाइफ इन्शुरन्स ही आशियातील सर्वात मोठी बँकेतर वित्तीय सेवा देणारी कंपनी असून सध्या रिलायन्स कॅपिटलच्या विमा आणि म्युच्युअल फंड कंपन्यांत निप्पॉनची भागीदारी आहे. प्रस्तावित बँकेत सुमितोमोची चार टक्के आणि निप्पॉनची पाच टक्के भागीदारी राहील, असे रिलायन्स कॅपिटलने स्पष्ट केले. या करारासाठी नियामकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. या करारावर स्वाक्षºया झाल्या असल्याचे रिलायन्सने स्पष्ट केले. या वृत्तामुळे मुंबई शेअर बाजारात रिलायन्स कॅपिटलचे समभाग सहा टक्के वधारून 332 रुपयांवर पोहोचलो.


मजबूत भागीदारी
सुमितोमो मित्सुई ट्रस्ट बँक जपानमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी आहे. एक चांगली गुंतवणूकदार संस्था म्हणून तिचा नावलौकिक आहे. सुमितोमोची एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर आहे. निप्पॉनचे वार्षिक उत्पन्न 71 अब्ज डॉलर आहे. त्यामुळे ही भागीदारी मजबूत होईल.
सॅम घोष, सीईओ, रिलायन्स कॅपिटल

या कंपन्या शर्यतीत...
रिलायन्सशिवाय रेलिगेअर एंटरप्रायजेझ, आदित्य बिर्ला समूह, जे. एम. फायनान्शियल, टीएफसीआय आणि टाटा समूहासह इतर कंपन्या नव्या बँकांसाठी इच्छुक आहेत. महिंद्रा समूहाने या शर्यतीतून माघार घेतली आहे.