नवी दिल्ली- सणासुदीच्या दिवसांत देशातील जनतेला एक वाईट बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे एका वर्षात मिळणार्या 12 अनुदानित गॅस सिलिंडरमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. एका कुटूंबाला वर्षाकाठी 9 अनुदानित गॅस सिलिंडर देण्याबाबत मोदी सरकार विचाराधीन आहे. अर्थमंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयाला घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान कपातीचे निर्देश दिले आहेत.
एका इंग्रजी भाषिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सध्या एका कुटूंबाला एका वर्षांत सरकारतर्फे 12 गॅस सिलिंडरवर अनुदान दिले जाते. मात्र, यामुळे अनुदानावरील सरकारचा आर्थिक भार जवळपास 30 टक्क्यांनी वाढला आहे. हा आर्थिक भार जवळपास 60 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
दरम्यान, राजकारणात
आपली प्रतिभा आणखी चांगली व्हावी, या उद्देशाने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गॅस सिलिंडरची संख्या 9 वरून 12 वर करण्यात आली होती. परंतु गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला या घोषणेचा विशेष फायदा झाला नाही. मात्र, कॉंग्रेसच्या या घोषणेमुळे भाजप सरकारची चांगलीच पंचाईत झाली आहे. सरकारी अनुदानावरील आर्थिक भार प्रचंड वाढला असून तो कमी करण्याबाबत मोदी सरकारने पावले उचलली आहे.