आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 लाख कोटींचा काळा पैसा परदेशात- फिक्की; 9 पटींनी वित्तीय तूट भरून निघेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- परदेशात भारतीयांनी 45 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा दडवलेला असल्याचे उद्योगजगतातील अग्रगण्य संघटना फिक्कीने म्हटले आहे. हा पैसा भारतात आणला गेला तर देशाची वित्तीय तूट भरून सरकारी तिजोरी ओसंडून जाईल, असेही फिक्कीचे मत आहे. जागतिक मंदीचे सावट भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून येत आहे. यंदाच्या वित्त वर्षात भारताची महसुली तूट 5.13 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. हा आकडा सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 5.1 टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी फिक्कीने 12 मुद्दे मांडले आहेत.
संस्थेच्या आकलनानुसार, परदेशात भारताचा एकूण 45 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आहे. हा आकडा सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 50 टक्के इतका आहे. हा सर्व पैसा भारतात आणला गेला तर भारताची तूट नऊ पटींनी भरून निघेल. इतकेच नव्हे तर यापैकी दहा टक्केही पैसा आणण्यात आपण यशस्वी झालो तरीही वित्तीय तुटीच्या किती तरी रक्कम देशाला मिळू शकेल. 45 लाख कोटी रुपयांचे अनुमान कसे लावले, हे मात्र फिक्कीने स्पष्ट केलेले नाही. दुसरीकडे सरकारनेही परदेशात किती काळा पैसा दडवलेला आहे याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. देश आणि परदेशातील काळ्या पैशाचे आकलन करण्यासाठी सरकारने एनआयपीएफपी, एनआयएफएम आणि एनसीएईआर या तीन संस्थांना स्वतंत्रपणे नेमले आहे. डेबिट आणि के्रडिट कार्डचा वापर वाढवण्यासाठी कर सवलत प्रोत्साहन देण्याची गरज फिक्कीने व्यक्त केली आहे. याशिवाय काळ्या पैशांना लगाम लावण्यासाठी ‘जीएसटी’ची लवकर अंमलबजावणी करावी, असेही संस्थेने म्हटले आहे.
विदेशी ग्राहकांची स्विस बँकेकडे पाठ
नवी दिल्ली- स्विस बॅँकेतील बेहिशेबी रकमेची छाननी करण्याचा दबाव वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय पण जवळपास 2008 पासून स्वीस बँकेकडून व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या विदेशी मालमत्तेत घट होऊ लागली आहे. या बॅँकेतील विदेशी ग्राहकांचे प्रमाण चार वर्षांत जवळपास 300 अब्ज स्विस फ्रॅँक्सने (अंदाजे 20 ट्रिलियन रु.) घसरले आहे. स्विस बॅँकेतील एकूण मालमत्तेतील विदेशी ग्राहकांचा वाटा 2011 च्या अखेरीस 51 टक्क्यांनी घटला आहे. चार वर्षांतील हे सर्वात नीचांकी प्रमाण आहे. स्विस बॅँकेच्या संपत्ती व्यवस्थापन व्यवसायामध्ये पारंपरिकदृष्ट्या विदेशी ग्राहकांचे महत्त्व जास्त आहे. परंतु स्विस बॅँकेत बेकायदेशीरपणे ठेवलेल्या मालमत्तेसंदर्भात कारवाई करण्याचा दबाव विदेशी सरकारांकडून सारखा वाढत आहे. त्याचाही काहीसा फटका अलीकडच्या वर्षांत बॅँकेला बसला आहे.