आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुक व्हॅल्यू आणि त्याचा उपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राइस टू बुक व्हॅल्यू, आऊटस्टँडिंग शेअर्स : कंपनीचे शेअर खरेदी करण्यापूर्वी लक्षात घेण्याचा आणखी एक निकष म्हणजे बुक व्हॅल्यू आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू. कंपनीचे एकूण अ‍ॅसेट वजा कंपनीची लायबिलिटी भागिले कंपनीचे बाजारात असलेले म्हणजे आऊटस्टॅडिंग शेअर्स. यातून आपल्याला त्या कंपनीच्या शेअरची प्रतिशेअर बुक व्हॅल्यू किती आहे ते कळते.


शेअर होल्डर्स फंड : कंपनीचे भागभांडवल + कंपनीचा राखीव निधी याला शेअर होल्डर्स फंड असेही म्हटले जाते. या सूत्रावरून दिसेल की, बुक व्हॅल्यूमुळे कंपनीचा राखीव निधी (रिझर्व्ह) किती आहे ते कळते. जर कंपनीकडे काहीच राखीव निधी नसेल तर तिच्या शेअरची बुक व्हॅल्यू तिच्या फेस व्हॅल्यूइतकी असेल. कंपनीने मागील वर्षांचा संचित तोटा बॅलन्सशीटमध्ये कॅरी फॉरवर्ड केला असेल तर तिचा राखीव निधी निगेटिव्ह होतो. अशा वेळेस प्रतिशेअर बुक व्हॅल्यू हा फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल. तसेच तोटा कंपनीच्या भाग भाडंवलापेक्षाही जास्त झाला तर प्रतिशेअर बुक व्हॅल्यू निगेटिव्ह होते. बुक व्हॅल्यूचा हिशेब करताना प्रीफरन्स शेअर कॅपिटल व प्रीफरन्स शेअरची संख्या दोन्ही विचारात घेतले जात नाही.


उदाहरणासाठी एचडीएफसी लिमिटेडचे 2012-13 चे आकडे बघू. त्यानुसार कंपनीचे कन्सॉलिडेटेड भाग भाडंवल (इक्विटी कॅपिटल) 309.27 कोटी रुपये आहे. तिचा कन्सॉलिडेटेड राखीव निधी व सरप्लस एकूण 31,751.08 कोटी रुपये आहे. दोन्ही बेरीज करून तिचा शेअर होल्डर्स फंड होतो 32,060.35 कोटी रुपये. तिच्या शेअरची संख्या 154,63,47,255 (154.63 कोटी) असल्याने बुक व्हॅल्यू पर शेअर होते 207.33. (32060.35 भागिले 154.63). या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 2 रुपये आहे. म्हणजेच याची बुक व्हॅल्यू त्यापेक्षा 103 पटीने अधिक आहे. या कंपनीच्या शेअरची मार्केट प्राइस 3 ऑगस्ट 13 ला 808 रुपये आहे. त्यामुळे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशिओ 3.90 होतो. याचा अर्थ 207.33 या बुक व्हॅल्यूच्या सुमारे चारपट भाव मार्केट या शेअरला देत आहे. 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या हिशेबात शेअरचा भाव 404 पट होतो. पण बुक व्हॅल्यू हे शेअरचे खरे नेटवर्थ व त्या प्रमाणात मार्केट शेअरला भाव देत आहे हे लक्षात येईल.


वरील उदाहरणात कंपनीचे भागभांडवल (इक्विटी कॅपिटल) फक्त 309.27 कोटी रुपये आहे, तर राखीव निधी (रिझर्व्ह) व सरप्लस एकूण 31,751.08 कोटी रुपये आहे. हा इतका राखीव निधी कुठून आला? कंपनीला दरवर्षी किंवा वेळोवेळी जो नफा होतो त्याचे शेअर होल्डरना लाभांश (डिव्हिडंड) रूपाने वाटप केले जाते. पण पूर्ण नफा असा वाटून टाकला जात नाही. काही रक्कम कंपनी बाजूला काढते व ती राखीव निधीत जाते. या निधीचा ते व्यवसायात वाढ करण्यासाठी उपयोग करू शकतात किंवा बोनस शेअरच्या रूपाने शेअर होल्डरना बक्षीस दिले जाते. नफ्याच्या रकमेपैकी किती रकमेचा लाभांश द्यायचा, किती राखीव निधीत जमा करायचे ते कंपनी स्वत:च ठरवते.


कन्सॉलिडेटेड रिझल्ट : जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीचा 2012-13 चा कन्सॉलिडेटेड रिझल्ट लक्षात घेतला तर तिची बुक व्हॅल्यू पर शेअर 764.83 आहे, पण शेअरचा मार्केटमधील भाव 3 ऑगस्ट 13 ला 531 आहे. याचा अर्थ हा शेअर बुक व्हॅल्यूपेक्षाही कमी किमतीत जणू डिस्काउंटला मिळत आहे. तथापि हा शेअर लगेच खरेदी करावा असा त्याचा अर्थ नाही. कंपनीच्या व्यवसायात काय अडचणी आहेत, स्टील बनवण्यासाठी आवश्यक असलेले आयरन ओअर कंपनीला नियमित मिळू शकेल का, इथून पुढे कंपनीची वाढ कशी होईल या बाबी विचारात घेऊन मगच शेअर खरेदीचा निर्णय घेता येईल. या उदाहरणावरून लक्षात येईल की बुक व्हॅल्यू हा अतिशय सोपा निकष आहे, पण तो तितकाच अतिशय ढोबळ निकष आहे. केवळ त्यावर विसंबून शेअर खरेदीचा निर्णय घेता येणार नाही. कंपनीचा व्यवसाय, तिच्यावर असलेले कर्ज या बाबीही लक्षात घेणे आवश्यक आहे.


शेअर मार्केट सध्या उतरतेच : सध्या शेअर मार्केट खूप खाली आलेले आहे. त्यामुळे टाटा स्टीलसारख्या काही चांगल्या कंपन्या आणि काही सरकारी बँका बुक व्हॅल्यूपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत. पण एकूण अर्थव्यवस्थेची वाटचाल कशी होईल, शेअर मार्केट यापुढे आणखी खाली जाईल की वर हा विचार करून तसेच प्रत्येक कंपनीचा विचार करून मग निर्णय घेणे हिताचे आहे.