आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार तेजीत, आयपीओ थंडच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारात तेजीची हवा असली तरी ती अद्याप प्राथमिक समभाग बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयपीओच्या अर्थात प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून केवळ एक हजार कोटी निधी उभारणे शक्य होऊ शकेल.

यंदा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये २५ कंपन्यांच्या ‘आयपीओ’मधून केवळ १,०१९ काेटी रुपयांचे िनधी संकलन झाले आहे. त्याउलट ३० सप्टेंबर २०१३ अखेर संपलेल्या सहामाही कालावधीत १६ कंपन्यांनी एकत्रितपणे १,०५० कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचे प्राइम डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

चाैथ्या तिमाहीत आयपीओची बरसात : भांडवल बाजारात तेजीचे वातावरण असले तरी एनडीए सरकारला लक्षणीय विजय मिळेल, असे भाकीत फार थोड्या जणांनी व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे आयपीओ प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. परंतु आर्थिक वर्षाच्या उरलेल्या सहामाहीत, विशेषकरून चौथ्या तिमाहीत बाजार नियंत्रकांकडे परवानगी मागण्यासाठी आणखी आयपीओ सादर होतील, अशी अपेक्षा प्राइम डेटाबेसचे पृथ्वीराज हल्दिया यांनी व्यक्त केली.

निर्गुंतवणुकीबाबत निरुत्साह : चालू आर्थिक वर्षामध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५८,४२५ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले तरी त्याबाबत सध्या निरुत्साहाचेच वातावरण आहे. निर्गुंतवणुकीची घोषणा करण्यात सहा महिने निघून गेले; पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे प्राइम डेटाबेसने म्हटले आहे.

आता निर्गुंतवणुकीवर मदार
* पहिल्या सहामाहीत बाजारात आलेले एकूण आयपीओ : २५. एसएमई क्षेत्रातील आयपीओ : २१
* बिगर एसएमई आयपीओ : ४
* निधी उभारणी : ८५१ कोटी रु.
* एकूण निधी उभारणीतील प्रमाण : ८४%
* बडे आयपीओ : शारदा क्रॉपकेम - ३५२ कोटी रु.
* एसएमईमधील मोठा आयपीओ : मोमाई अ‍ॅपरल्स - ३० कोटी रु.
* यंदा या कंपन्या गाठणार निर्गुंतवणुकीचे लक्ष्य : ओएनजीसी, कोल इंडिया, सेल, एनएचपीसी, पीएफसी, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन
* आयपीओसाठी सेबीची परवानगी असलेल्या कंपन्या : ५
एकूण निधी उभारणी : १,२४० कोटी रु.
सेबीच्या परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या कंपन्या : ११
निधी उभारण्याचे लक्ष्य : ४,७०७ कोटी रु.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून गोळा झालेला निधी : २,५९३ कोटी रु.