आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजीचा बार; सेन्सेक्स 20 हजारांपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले. निर्यातीत मोठी वाढ आणि आयातीत विक्रमी घट, असे फील गुड समीकरण दिसून आल्याने ऐन नवरात्रोत्सवात बुधवारी बाजारात तेजीचा बार उडाला. सेन्सेक्सने 266 अंकांच्या वाढीसह 20 हजारांचा टप्पा पार केला, तर निफ्टीने सहा हजारांची महत्त्वाची पातळी ओलांडली. हा तीन आठवड्यांचा उच्चांक आहे.


बांधकाम, आरोग्य, बँका आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली. बाजारातील तेरा क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 12 निर्देशांक वधारले. इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा या दिग्गज समभागांच्या जोरदार खरेदीने सेन्सेक्सच्या तेजीला धार आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक विकास
घटणार असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच व्याजदर कपातीसाठी महागाईकडे लक्ष राहील, असे मत गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे प्रारंभीच्या सत्रात सेन्सेक्सची चाल नकारात्मक होती. मात्र, आयात-निर्यातीचे आकडे आले आणि बाजारात उत्साह संचारला. दिवसअखेर सेन्सेक्स 266.65 अंकांच्या वाढीसह 20,249.26 वर बंद झाला, तर निफ्टीने 79.05 अंकांच्या कमाईसह 6007.45 पर्यंत मजल मारली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 25 समभाग वधारले.


आशियातील प्रमुख बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया बाजार तेजीसह बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारांतही संमिश्र कल होता.


सोने पुन्हा स्वस्त
उच्चस्तरावर पोहोचलेल्या सोन्याच्या किमतीत नफेखोरी झाल्याने बुधवारी सोन्याला फटका बसला. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 120 रुपयांनी स्वस्त होऊन 30,810 झाले. चांदी किलोमागे 280 रुपयांनी घटून 49,670 झाली.


रुपया घसरून 61.93 वर
डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपयाची घसरण झाली. रुपयाने 14 पैसे गमावत 61.93 ही पातळी गाठली. आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मागणीमुळे रुपयाचे मूल्य घसरले. मागील काही दिवसांत रुपयाच्या मूल्यात झालेली ही मोठी घसरण आहे.


व्यापारी तूट घटल्याचा आनंद
दोन वर्षांनंतर आयातीत घट आणि निर्यातीत विक्रमी वाढ, असे समीकरण जुळून आल्याने बाजारात उत्साह दिसून आला. यामुळे रुपयाच्या मूल्यालाही फायदा होणार आहे. राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ.