आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boom In Market, Sensex On 27 Thousand, Nifty On 8100

बाजारात तेजीची लाट; सेन्सेक्स २७ हजारांवर, निफ्टी ८१०० वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे कर सुधारणांचा मार्ग मोकळा होण्याच्या बाजाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच वधारलेला रुपया आणि जागतिक बाजारातील तेजीमुळे बाजारात चांगली खरेदी झाली. परिणामी अलीकडच्या मोठ्या घसरणीनंतर सेन्सेक्स पुन्हा २७ हजारांच्या, तर निफ्टी ८१०० अंकांच्या पातळीवर गेला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नाणेनिधी धोरणात कोणताही बदल न केल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांना दिलासा मिळाला. या बाजारात आलेल्या तेजीचे पडसाद मुंबई शेअर बाजारात उमटले. वस्तू आणि सेवा करावरील घटनात्मक सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यामुळे बाजाराला बळकटी मिळाली. त्याच्याच जोडीला रुपयादेखील १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून पुन्हा मजबूत झाल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह वाढला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा २७ हजार अंकांच्या पातळीवर येऊन त्याने दिवसभरात २७.१८०.९२ अंकांची कमाल पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स ४१६.४४ अंकांची उसळी घेऊन २७,१२६.५७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. ३१ ऑक्टोबरनंतरची ही सर्वात मोटी वाढ आहे. त्या वेळी सेन्सेक्सने ५१९.५० अंकांची वाढ नोंदवली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील पुन्हा ८,१०० अंकांच्या पातळीवर आला. निफ्टीमध्ये १२९.५० अंकांची वाढ होऊन तो ८१५९.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

जीएसटीला सलामी
सात वर्षे प्रलंबित असणाऱ्य वस्तू व सेवाकर (जीएसटी) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने शेअर बाजारात उत्साह आला. गुंतवणूकदारांनी लॉजिस्टिकसह इतर कंपन्यांच्या समभागांची भरभरून खरेदी केली. त्यामुळे बाजारातील तेजीला बळ आले.

फेडरलचा दिलासा
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ न करण्याचे संकेत दिल्याने बाजाराला मोठा दिलासा मिळाला. फेडरलच्या प्रमुख जॅनेट येलेन यांनी आगामी दोन बैठकांत तरी व्याजदर वाढीबाबत चर्चा होणार नसल्याचे सांगितले.