आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Booming Days Come In India, Development Rate Go On 6 Percent

भारतात सुगीचे दिवस येणार, आर्थिक विकासदर सहा टक्क्यांवर जाणार - जागतिक बँकेचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक मागणीतील सुधारणा आणि गुंतवणुकीत वाढ अपेक्षित धरता यंदाच्या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत सहा टक्के आणि 2016-17 वर्षात ती 7.1 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक आर्थिक पेचप्रसंगानंतर पाच वर्षांनी उगवत्या तसेच अति उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये चांगली वाढ होत असल्याने यंदाच्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याचा अंदाज आहे. परंतु तरीही जागतिक अर्थव्यवस्थेला जोखमीचा धोका संभवतो, असे मत जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष जीम याँग किम यांनी अहवालात व्यक्त केले आहे.
प्रगत अर्थव्यवस्थांची कामगिरी चांगली होत असून त्यामुळे येणा-या महिन्यांमध्ये उगवत्या देशांमधील आर्थिक वाढीला भक्कम आधार मिळणार आहे. तरीही विकसनशील देशांमध्ये दारिद्र्य निर्मूलनाला गती देण्याबरोबरच रोजगार निर्मिती, आर्थिक यंत्रणांना बळकटी तसेच सामाजिक सुरक्षा जाळे अधिक मजबूत होण्यास चालना देण्यासाठी रचनात्मक सुधारणा हाती घेणे गरजेचे असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासूनचा महागाईचा चढता आलेख आणि चालू खात्यातील वाढती तूट यामुळे दक्षिण आशियामध्ये भारतातील वाढ मंदावली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नकारात्मक उत्पादन पोकळी निर्माण झाली आहे. परंतु अर्थव्यवस्थेत हळूहळू सुधारणा होत असल्यामुळे ही पोकळी भरून निघेल. भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या
आर्थिक वर्षात 5.7 टक्के आणि 2016 मध्ये 6.7 टक्क्यांपर्यंत बळकट होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या या चांगल्या कामगिरीचे पडसाद या प्रांतात दिसून येतील, असेही या अहवालात म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेतील मरगळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील वाढ गेल्या वर्षात 4.6 टक्के इतकी कमी झाल्याचा अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत नुकत्याच संपलेल्या वर्षापासून सुधारणा होऊ लागली असून विभागीय जीडीपी वार्षिक आधारावर 2016 पर्यंत जवळपास 6.7 टक्क्यांपर्यंत हळुवार वाढण्याचा अंदाज आहे. बाहेरील मागणी आणि गुंतवणुकीतील सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील भक्कम वाढीचे प्रतिबिंब त्यात असेल, असेही अहवालात म्हटले आहे.
दोन वर्षांत सुधारणा :
* आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर केवळ सहा टक्क्यांवर जाण्याचा अंदाज असून तो 2015-16 मध्ये 6.6 टक्के आणि 2016-17 पर्यंत 7.1 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. देशातील गुंतवणुकीत होणारी वाढ आणि जागतिक मागणीतील सुधारणा या दोन गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेत वाढ होण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
* पहिल्या तिमाहीत भारतात येणारा विदेशी निधीचा ओघ आटला होता. परंतु रुपयाच्या अवमूल्यनामुळे तो पुन्हा वाढून गेल्या वर्षाच्या डिसेंबरमध्ये 71 अब्ज डॉलरवर गेल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.