आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSE Sensex Hits Life High Of 22074.34; Bank Stocks Lead, News In Marathi

सेन्सेक्स 22 हजार पार;निफ्टीने गाठली 6583.50ची पातळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी गुंतवणूकदारांनी बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी केल्याने सोमवारी शेअर बाजारातील तेजीला उधाण आले. सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक नोंदवत विक्रम केला. सेन्सेक्स 300.16 अंकांनी वाढून 22055.48 या विक्रमी पातळीवर, तर निफ्टी 88.60 अंकांच्या कमाईसह 6583.50 या पातळीवर स्थिरावला. इंट्रा डे व्यवहारात निफ्टीने 6591.50 ही आजवरची सर्वोच्च पातळी गाठली होती.

एक एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा घेणार आहे. त्यात व्याजदर कपातीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतेने सोमवारी बँकांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्याशिवाय ओएनजीसी, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी आणि गेल या समभागांतील चांगल्या खरेदीने निर्देशांकांना तेजीला बळ दिले. शनिवारीही विदेशी गुंतवणूकदारांनी 14.79 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 24 समभाग तेजीने चमकले.

आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. हाँगकाँग, चीन, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान बाजारात 0.33 ते 1.91 टक्के तेजी दिसून आली. युरोपातील प्रमुख शेअर बाजारात सत्राच्या प्रारंभी घसरण दिसून आली.

सोने घसरले, चांदी काळवंडली
जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि देशातील सराफा बाजारातील कमी मागणीचा फटका सोमवारी सोन्याच्या किमतीला बसला. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 150 रुपयांनी घसरून 30,200 झाले. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी घटल्याचा फटका चांदीला बसला. चांदी किलोमागे 400 रुपयांनी घटून 44,550 झाली. पाच सत्रांत चांदी किलोमागे 2250 रुपयांनी स्वस्त झाली. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.7 टक्क्यांनी घटून 1325.05 डॉलर झाले.

बँकांचे समभाग तेजीत
येत्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता असल्याने बँकांचे समभाग गुंतवणूकदारांच्या नजरेत भरले. सोमवारी बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. आयसीआयसीआय बँकेचा समभाग 3.71 टक्के वाढीसह, तर एचडीएफसी बँकेचा समभाग 2.53 टक्क्यांनी वधारला. या दोन ब्ल्यू चिप समभागांनी निर्देशांकाच्या तेजीत 99.38 अंकांची भर टाकली. इंडसइंड बँकेचा शेअर 4.16 टक्के, कोटक महिंद्राचा समभाग 3.81 टक्क्यांनी, पंजाब नॅशनल बँक 3.05 टक्के, अ‍ॅक्सिस बँक 1.53 टक्क्यांनी वधारले. व्याजदराशी निगडित सर्व समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.