आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसच्या आपटीने तेजीला टाचणी, निर्देशांकातील मागील चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची संपत असलेली मुदत आणि दुसर्‍या बाजूला इन्फोसिसच्या समभागांची पडझड याचा मोठा फटका बाजाराला बसला. बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच 322 अंकांच्या मोठ्या घसरणीची नोंद केली.
सेन्सेक्स दिवसअखेर 24,234.15 अंकांच्या दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तर निफ्टी 94 अंकांनी घसरून 7,235.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचे प्रमुख दावेदार असलेले कंपनीचे अध्यक्ष बी.जी. श्रीनिवासन यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजारात खळबळ माजली. या राजीनामा नाट्यानंतर सप्टेंबरच्या मध्यानंतर पहिल्यांदाच इन्फोसिसच्या समभागांनी मोठी आपटी खाली. या समभागाची किंमत 7.81 टक्क्यांनी घसरून 3000 रुपयांच्या खाली गेली. सेन्सेक्स यादीतील कंपन्यांमध्ये इन्फोसिसला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळेही सेन्सेक्सची जवळपास 135 पेक्षा जास्त अंकांनी पडझड झाली.
सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 24,523.13 अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर तो 24,528.20 आणि 24,206.50 अंकांच्या श्रेणीत फिरत होता. दिवसअखेर तो 321.94 अंकांनी घसरला. 27 जानेवारीच्या 426.11 अंकानंतर एकाच दिवसात झालेली ही दुसरी मोठी घसरण आहे. निफ्टीमध्ये 27 जानेवारीला 130.90 अंकांची घसरण झाली होती
बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात 12 पैकी 11 क्षेत्रीय निर्देशांकही आपटले. त्यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता आणि ऊर्जा समभागांना फटका बसला. पण हेल्थकेअर हा एकमेव निर्देशांक यातून बचावला.
एफआयआयकडून जोरदार विक्री
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) गेल्या तीन दिवसांपासून विक्रीचा मारा सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेपाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त समभागांची विक्री केली आहे. त्यामुळे बाजार घसरण्यासाठी हेही एक मुख्य कारण ठरल्याचे व्हॅरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांनी सांगितले. जपानमधील किरकोळ विक्रीत अपेक्षेपेक्षा जास्त घट झाल्याने आशियाई शेअर बाजारात मरगळ होती. त्याचाही बाजारावर परिणाम झाला.
टॉप लुझर्स : ओएनजीसी, सिप्ला, भेल, विप्रो, कोल इंडिया, एल अँड टी, एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, भारती एअरटेल.
टॉप गेनर्स : हिंदाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब.
रुपया पुन्हा घसरला
आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याचा फटका गुरुवारी रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 10 पैशांनी घसरून 59.03 झाले. मागील पाच दिवसांत रुपयाचे मूल्य चार वेळा घसरले आहे. फॉरेक्स डीलर्सनी सांगितले, महिना अखेर असल्याने आयातदारांकडून डॉलरला चांगली मागणी आली. त्यातच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचा फटका रुपयाच्या मूल्यावर झाला. मागील तीन सत्रांत रुपयाचे मूल्य 57 पैशांनी घसरले आहे.