आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीमुळे बाजाराची आपटी; सेन्सेक्स, निफ्टीत सलग दुसर्‍यांदा घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कॉग्निजंट या आघाडीच्या कंपनीने वार्षिक विक्री लक्ष्याचा अंदाज घटवल्याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारात उमटले. त्यातच युरोपातील आर्थिक स्थिती आणि जागतिक घडामोडींच्या धास्तीने गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका कायम ठेवल्याने सलग दुसर्‍या सत्रात सेन्सेक्स, निफ्टी गडगडले. सेन्सेक्स 76.26 अंकांच्या घटीसह 25,589.01 वर, तर निफ्टी 22.80 अंकांच्या घसरणीसह 7,649.25 वर स्थिरावला.
अमेरिकेत मुख्यालय असलेल्या कॉग्निजंट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने 2014 या वर्षातील महसूलविषयक उद्दिष्ट 16.5 टक्क्यांवरून 14 टक्के केले. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएससह इतर कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. बीएसई आयटी आणि बीएसई तंत्रज्ञान हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे 1.68 टक्के ते 1.56 टक्क्यांनी घसरले.
सोने झळाळले, रुपयाला तरतरी
देशातील सणांचा हंगाम आणि जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल यामुळे गुरुवारी मौल्यवान धातूंच्या किमती वधारल्या. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 300 रुपयांनी चकाकून 28,800 झाले. चांदी किलोमागे 450 रुपयांनी वाढून 44,500 झाली. तिकडे विदेशी मुद्रा विनिमय बाजारात रुपयाने जोरदार पुनरागमन साधत 61.22 पर्यंत मजल मारली.
सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, देशात आता सणांचा हंगाम सुरू झाला आहे. सणांतील ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे सोने तेजीने झळाळले. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.2 टक्क्यांनी वाढून 1308.13 डॉलर झाले. चांदी औंसमागे 0.2 टक्क्यांनी वाढून 20.08 डॉलरवर पोहोचली.