आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Ends 380 Points Higher; Bank Nifty Tops 19000

बाजारात तेजी, सेन्सेक्सची ३८० अंकांची उसळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उत्साह वाढवणारी उत्पादन क्षेत्राची कामगिरी आणि क्षेत्रीय सुधारणांच्या शक्यतेमुळे बँक समभागांना आलेली मागणी यामुळे सेन्सेक्सने सलग सहाव्या सत्रात चढती कमान कायम राखत ३८०.३६ अंकांची उसळी मारली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकात १११ अंकांनी वाढ होऊन तो ८३९५.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या सक्षमीकरणासाठी केवळ खरेदी आणि विलीनीकरण हाच एकमेव मार्ग नाही, तर त्यांच्या ताळेबंदात सुधारणा करण्याबरोबरच त्यांना सहज भांडवल उपलब्ध होऊ शकेल अशी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे मत वित्त सेवा सचिव हसमुख आधिया यांनी पुण्यात सुरू असलेल्या दोन दिवसांच्या बँक परिषदेत व्यक्त केले. त्यामुळे या परिषदेत बँकिंग उद्योगासाठी काही तरी सकारात्मक पावले उचलली जाण्याची अपेक्षा निर्माण झाल्याने बँक समभागांना मागणी आल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले.

डिसेंबरच्या तिमाहीतील कंपन्यांच्या निकालांचा हंगाम सुरू होत असून ९ जानेवारीला इन्फोसिसचा पहिला निकाल जाहीर होणार असल्यामुळेही बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उत्साहातून झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्स ३८०.३६ अंकांनी वाढून २७,८८७.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सने गेल्या तीन आठवड्यांतील भक्कम बंद पातळीची नोंद केली. दिवसभरात २७,९३७.४७ अंकांच्या कमाल पातळीची नोंद करणार्‍या सेन्सेक्समध्ये गेल्या सहा सत्रांमध्ये ६४६ अंकांची कमाई केली आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसअखेर निफ्टीमध्ये १११.४५ अंकांची वाढ होऊन तो ८३९५.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बँकांचे समभाग जोरात
बँकिंग क्षेत्रातील संभाव्य सुधारणांच्या अपेक्षेने शुक्रवारी बँकांच्या समभागांना मोठी मागणी आली. बँकांचे समभाग ३ टक्क्यांपर्यंत वधारले. त्यामुळे एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक (२.८१ टक्के वाढ), येस बँक (२.६० टक्के वाढ), अ‍ॅक्सिस बँक (२.४४ टक्के वाढ) कोटक महिंद्रा (१.४८ टक्के वाढ), एचडीएफसी बँक (१.४३ टक्के वाढ), बँक ऑफ इंडिया (१.१७ टक्के वाढ),बँक ऑफ बडोदा (१.०४ टक्के वाढ) तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनायटेड बँकेच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.