आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत बीएसएनएल येणार नफ्यात, खासगी कंपन्यांच्या टेरिफशी करणार स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीला येत्या पाच वर्षांत नफ्यात आणण्याची योजना आहे. यासाठी केंद्र सरकारने एक मसुदा तयार केला आहे. सरकारने हे लक्ष्य गाठल्यास कंपनी २०१८-१९ मध्ये दहा वर्षांनंतर बीएसएनएल नफ्यात येईल.
बीएसएनएल २००९-१० पासून सलग तोट्यात आहे. मागील वर्षात २०१३-१४ मध्ये कंपनीचा तोटा ६९३३.२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठीच्या धोरणाबाबत बीएसएनएलचे नूतन सीएमडी अनुपम श्रीवास्तव यांनी मनी भास्करला सांगितले, येत्या पाच वर्षांत कंपनी नफ्यात येऊ शकते. यासाठी कंपनी इंटरनेट सेवांच्या विस्तारावर भर देणार आहे. यावरच कंपनीचा मुख्य जोर राहील.

ब्रॉडबँड, वाय-फायवर भर
येत्या पाच वर्षांत कंपनी प्रामुख्याने ब्रॉडबँड सेवांचा विस्तार आणि वाय-फाय हॉट स्पॉट बनवण्यावर भर देणार आहे. या अंतर्गत देशातील प्रमुख शहरांत वाय-फाय स्पॉट तयार करण्यात
येतील. त्याशिवाय कंपनी आवश्यकतेनुसार फोर-जी सेवा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.

कमी शुल्कावर राहणार लक्ष
श्रीवास्तव यांच्या मते, नव्या धोरणात ग्राहकांवर लक्ष केंद्रित राहील. यात कंपनी आपली सेवांचा दर्जा उत्तम राखण्यावर जोर देईल. यासाठी कॉल सेंटर व्यवस्था मजबूत करणे व ग्राहकहिताची पावले टाकण्यात येतील.