आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट इक्विटी रेशो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 16 ऑगस्टला शेअर बाजारात हाहाकार झाला. सेन्सेक्स 764 अंकांनी खाली आला. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण लवकरच व्याजदर वाढतील. त्यामुळे कंपन्यांवरील व्याजाचा बोजा वाढेल, नफा कमी होईल हेही एक कारण आहे. डेट इक्विटी रेशो जाणून घेणे, हा रेशो जास्त असलेल्या कंपन्यांचे शेअर घेताना जास्त विचार करणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.

डेट इक्विटी रेशो म्हणजे कंपनीवरील दीर्घ मुदतीचे कर्ज व कंपनीचे भागभांडवल अधिक रिझर्व्ह (म्हणजेच शेअर होल्डर्स फंड किंवा नेटवर्थ) यांचे प्रमाण.

उदा : जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीचा 2013-13चा वार्षकि निकाल व त्यातील कन्सॉलिडेटेड आकडे लक्षात घेऊ. कंपनीचे नेट डेट म्हणजे कर्ज आहे 19533.07 कोटी रुपये. कंपनीचे एकूण भाग भांडवल आहे 563.18 कोटी रुपये (प्रीफरन्स शेअर्ससहित) व रिझर्व्ह आणि सरप्लस आहे 16780.55 कोटी रुपये. म्हणजे शेअर होल्डर्स फंड होतो : 563.18 + 16780.55 = 17343.43 कोटी रुपये.

त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचा डेट इक्विटी रेशो होईल : 19533.07/17343.43 = 1.12. हे योग्य प्रमाण समजले जाते. डेट इक्विटी रेशो हा खूप जास्त असेल तर ते चांगले समजले जात नाही. प्रत्येक क्षेत्रासाठी हा रेशो किती असावा याचे वेगळे निकष आहेत. माहिती तंत्रज्ञान / सेवा क्षेत्रामधील कंपन्यांसाठी हा एक किंवा त्यापेक्षाही कमी असतो, तर स्टील उत्पादक कंपन्यांसाठी साधारण दोन रेशो योग्य समजला जातो. पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांचा हा रेशो तीन असणे प्रमाणाबाहेर मानले जात नाही. कंपन्यांना व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घ्यावे लागते. ही सहसा खूप मोठी व दीर्घ मुदतीची कर्जे असतात. आपल्याला जसे कर्ज घेतले की लगेच ईएमआय म्हणजे मासिक हप्ता सुरू होतो तसे या कर्जाबाबतीत मात्र नसते. फक्त व्याज चुकते करत राहावे लागते व मुदतीअंती किंवा ठरावीक कालावधीत टप्प्याटप्प्याने कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड करता येते. विशेषत: बाँड म्हणजे रोख्यांद्वारे कर्ज उभे केलेले असते तेव्हा ते मुदतीअंती परत करायचे असते. तसेच कंपन्यांना खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठीही लघु मुदतीची कर्जे घ्यावी लागतात. डेट इक्विटी रेशो काढताना सहसा फक्त दीर्घ मुदतीची कर्जेच विचारात घेतली जातात. तसेच काही विश्लेषक प्रीफरन्स शेअर कॅपिटल डेट (कर्जे) म्हणून विचारात घेतात तर काही इक्विटी म्हणून. हा रेशो काढताना कर्जामध्ये कोणत्या कर्जाचा समावेश केला आहे? या रेशोवरून हेही लक्षात येईल की, कंपनीवर खूप मोठे कर्ज असणे हे वाईट समजले जात नाही तर ते इक्विटीच्या किती प्रमाणात आहे ते बघितले जाते. हा रेशो खूप कमी आहे तर त्याचा असाही अर्थ लावला जाऊ शकतो की, कंपनी पैसा-भांडवल उभे करण्याची तिची जी क्षमता आहे त्याचा पूर्ण वापर करत नाही. कर्जे घेऊन नवे कारखाने टाकणे किंवा कंपन्या विकत घेऊन विस्तार करणे या संधीचा ती लाभ घेत नाही. जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचे उदाहरण आपण बघितले. इस्पात इंडस्ट्रीज ही कंपनी काही वर्षांपूर्वी त्यांनी विकत घेतली. त्याकरिता सुमारे सहा हजार कोटींचे कर्ज घेतले होते. यंदा जूनमध्ये कंपनीचे जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये विलीनीकरण झाले. यामुळे स्टील उत्पादन करणारी देशातील ती द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी झाली आहे व तिची उत्पादनक्षमता 14.30 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी झाली आहे.

कंपन्यांना अशा कर्जावरील व्याज चुकते करत राहावे लागते व त्या नफ्यातून चुकते करतात. जितके व्याज द्यावे लागते त्यांच्या कितीपट नफा कंपनी मिळवते आहे हा निकषही म्हणून बघितला जातो व त्याला इंटरेस्ट कव्हरेज रेशो म्हणतात.

जितके व्याज देत द्यावे लागत आहे त्याच्या कितीपट नफा कंपनी कमावत आहे ते यातून कळते. सहसा हे पाचपट तरी असावे, अशी अपेक्षा असते. मार्केटमध्ये तेजी असते तेव्हा अनेक कंपन्यांच्या शेअरचे भाव अवास्तव वाढतात. मंदी आल्यावर मात्र फंडामेंटल्स चांगले नसलेल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळतात. त्यामुळे तेजी असतानाही या बाबी लक्षात घेणे हिताचे आहे.


डेट इक्विटी रेशो फॉर्म्युला असा आहे.

डेट इक्विटी रेशो = लाँग टर्म डेट इक्विटी रेशो
शेअर होल्डर्स फंड किंवा नेटवर्थ


kuluday@rediffmail.com