कौशल्य कमतरता कंपन्यांसाठी / कौशल्य कमतरता कंपन्यांसाठी चिंतेचा विषय

प्रतिनिधी

Mar 28,2014 03:00:00 AM IST

मुंबई - कौशल्य कमतरतेचे वाढते प्रमाण हा देशातील कंपन्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे चांगल्या पदाच्या जागा रिक्त असल्या तरी त्यासाठी पात्र उमेदवार शोधणे कंपन्यांना मुश्कील झाले असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

नोकरीच्या बाजारपेठेत सध्या नोकरीच्या शोधात असलेले उमेदवारच चिंताग्रस्त नाही तर काही जागा खुल्या असल्या तरी काही पदांसाठी पात्र, प्रज्ञावान उमेदवार शोधणे व्यवसायांना कठीण जात असल्याचे ‘करिअर बिल्डर इंडिया’ या नोकरीविषयक संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

यंदाच्या जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात 500 कंपन्यांची प्रातिनिधिक माहिती घेऊन यंदाच्या जानेवारीमध्ये हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. नोकरभरती करण्याची जबाबदारी असलेल्या व्यवस्थापकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता.

देशातील कौशल्याचा अभाव हा लवकर न सुटणारा प्रश्न आहे. नोकरीच्या बाजारपेठेत उपलब्ध असलेली कर्मचारी कुशलता आणि कंपन्यांची गरज याचा ताळमेळ न बसण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या पूर्ण क्षमतांचा वापर कंपन्यांना करता येत नसून त्याचा व्यवसायाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम होत आहे, असे करिअर बिल्डर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रेमलेश माचमा यांनी सांगितले.

अहवालातील निरीक्षणे
० कुशल कर्मचार्‍यांच्या कमतरतेच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता : 78 टक्के
० जागा रिक्त असूनही त्यासाठी योग्य आणि पात्र उमेदवार मिळू न शकणे : 57 टक्के
० कुशलतेच्या अभावाचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो : 76 टक्के
० उपलब्ध पदासाठी आवश्यक असलेली कुशलता उपलब्ध नाही : 65 टक्के
० बारा आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त नोकरीचे पद भरले न जाणे : 36 टक्के

X
COMMENT