आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्ड स्वाइप करा, नॅनो कार घरी घेऊन जा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - किराणा सामान, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड स्वाइप केले की झाले काम, पण मोटारसायकल किंवा एखादी कार क्रेडिट कार्डाने खरेदी करता आली तर ? छे, कसे शक्य आहे असा विचार तुमच्या मनात येईल, पण टाटा मोटर्सने मात्र हे शक्य करून दाखवले आहे. आता तुम्ही टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये जाऊन नुसते कार्ड स्वाइप केले की थेट ‘नॅनो’ तुमच्या दारात उभी राहू शकणार आहे. क्रेडिट कार्डावरून अशा प्रकारची जंबो खरेदी करण्याची सुविधा देण्याचा पहिला मान टाटा मोटर्सने मिळवला आहे.

नॅनोप्रेमींना आपली मोटार खरेदी अगदी सुलभ आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय करणे शक्य व्हावे यादृष्टीने टाटा मोटर्सने थेट क्रेडिट कार्डाचा वापर करण्याची शक्कल लढवली आहे.

टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसायाचे अध्यक्ष रणजित यादव म्हणाले की, अशा प्रकारची पहिलीवहिली सुविधा देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे ग्राहकांना नॅनो मोटार झटपट आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय खरेदी करता येऊ शकणार आहे.

ग्राहकांना आपली क्रेडिट कार्डावरची संपूर्ण रक्कम व्याजमुक्त समान मासिक हप्त्यामध्ये रूपांतरित करण्याचा लाभ घेता येऊ शकेल. शून्य टक्के व्याजदराचा कालावधी 12 महिन्यांचा असल्याने ग्राहकांना त्यांच्या पैशाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. सामाईक मासिक हप्ता (ईएमआय) : 8,333 रु. (प्रति लाख रु.)

विशेष योजनेसाठी पाच बॅँकांशी भागीदारी : अ‍ॅक्सिस बँक, एचएसबीसी बॅँक, आयसीआयसीआय बॅँक, कोटक महिंद्रा बँक, स्टॅँडर्ड चार्टर्ड बॅँक आदी बँकांचे क्रेडिट कार्ड असलेले ग्राहक देशभरातल्या 26 शहरांमधील टाटा मोटर्सच्या 75 वितरण केंद्रात या विशेष योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मांझा कारसाठी ‘बायबॅक’ योजना - केंद्रीय अर्थसंकल्पानंतर टाटा मोटर्सने आपल्या इंडिका, इंडिगो आणि मांझा या मोटारींच्या किमती जवळपास 50 हजार रुपयांनी कमी केल्या. अलीकडेच कंपनीने आपल्या मांझा सेडान मोटारीसाठी बायबॅक योजना जाहीर केली आहे.