आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर खरेदी-विक्रीचे मार्केट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा शेअर्स आपल्या हातात आल्यावर ते विकण्याची सोय हवीच. त्यामुळे आयपीओद्वारे जे शेअर बाजारात येतात त्यांची स्टॉक एक्स्चेंजेसवर नोंदणी होते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) हे दोन प्रमुख स्टॉक एक्स्चेंजेस आहेत. तसेच एमसीएक्स-एसएक्स हे नवीन एक्स्चेंजही नुकतेच सुरू झालेले आहे. एफपीओद्वारे जे शेअर बाजारात आलेले असतात त्यांचीही स्टॉक एक्स्चेंजेसवर आधी नोंदणी झालेली असते. स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी झालेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार तिथे होत असतात व याला सेकंडरी मार्केट म्हणतात. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज(एनएसई) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर पाच हजारांवर कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात 1994 मध्ये झाली. एनएसईवर सुमारे एक हजार सहाशेहून अधिक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. अनेक कंपन्यांची दोन्ही एक्स्चेंजवर नोंदणी झालेली आहे. शेअर आपण कोणत्याही एक्स्चेंजमधून घेतले तरी कोणत्याही एक्स्चेंजवर विकू शकतो. फक्त त्या शेअरची नोंदणी त्या एक्स्चेंजवर झालेली असावी.

सेकंडरी मार्केट, फेस व्हॅल्यू
या सेकंडरी मार्केटमधील शेअर्सच्या खरेदी-विक्रीविषयी आपण जाणून घेऊ. प्रत्येक शेअरची एक फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत असते. बहुधा ती 10 रुपये असते, पण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये अशी फेस व्हॅल्यू असलेले शेअरही आहेत. कोल इंडिया या कोळशाचे उत्पादन करणार्‍या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. पण आज 23 मार्च 2013 ला या कंपनीच्या शेअरचा भाव 299/- रुपये इतका आहे. म्हणजे फेस व्हॅल्यूच्या 29 पट. या कंपनीचे शेअर आपल्याकडे असतील व आज आपण ते विकले तर प्रत्येक शेअरमागे आपल्याला 299/- रुपये इतका भाव मिळेल. मग आपण खरेदी करताना भलेही 240 रुपयांत केलेले असोत किंवा 340 रुपयांत केलेले असोत. आपण कोणत्या भावात खरेदी केले त्याला काहीच महत्त्व नसते. आता आपण किंवा विकणारा इतर कोणी या भावात शेअर विकत आहे, पण घेणारा त्या भावात का खरेदी करेल? इतका 29 पट जास्त भाव देऊन? कारण त्याचे अनुमान असते हा भाव पुढे आणखी वाढेल, तो परत कदाचित 340 रुपये होईल किंवा ज्या भावात तो घेत आहे त्यापेक्षा तर जास्त नक्कीच होईल. भाव वाढल्यावर मग तो विकून नफा कमावता येईल.
एक वास्तवातील उदाहरण बघू
टाटा स्टील या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. फेब्रुवारी 2009 मध्ये या शेअरचा भाव होता 156 रुपये. आज भाव आहे 338 रुपये, म्हणजे प्रत्येक शेअरमागे 182 रुपये नफा. फेब्रुवारी 2009 मध्ये टाटा स्टीलचे 1000 शेअर घेतले असते तर त्यासाठी :
156 1000 शेअर = 1,56,000 रुपये द्यावे लागले असते.
आज ते विकल्यावर 182 रुपये प्रतिशेअर नफा मिळत आहे. म्हणून एकूण नफा : 182 1000 शेअर = 1,82,000 रुपये नफा.
समजा हे 1,56,000 रुपये आपण बँकेत ठेवले असते तर त्यावर 9 टक्के दराने व्याज मिळाले असते. म्हणजे चार वर्षांत ढोबळपणे एकूण व्याज 64,206 रुपये. त्याऐवजी शेअर बाजारात गुंतवून नंतर आज ते शेअर विकल्यावर होणारा नफा आहे 1,82,000 रुपये. याचा अर्थ आपल्याला शेअर्समधील गुंतवणुकीतून (1,82,000 रुपये झ्र 64,206 = 1,17,794) इतके रुपये जास्ती मिळाले. मग काय मोह होतोय. आपला सर्व पैसा शेअर बाजारात गुंतवून त्यावर असा भरघोस नफा कमवायचा? कृपया घाईने काही ठरवू नका. कारण शेअर बाजारात जसा फायदा होतो तसाच तोटाही होऊ शकतो. आपण गुंतवलेले भांडवलही गमावू शकतो. जिथे तोटा आहे असे एक उदाहरण बघू : एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स ही एलईडीच्या व्यवसायात असलेली छोटी कंपनी आहे. जाहिरातीसाठी बिलबोर्डवर वगैरेसाठी एलईडीचा वापर होतो. कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे 2 रुपये. फेब्रुवारी 2011 मध्ये या शेअरचा भाव 27 रुपये होता. या कंपनीच्या शेअरचा आज 21 मार्च 2013 ला भाव आहे 4 रुपये. म्हणजे प्रतिशेअर तोटा 23 रुपये.
फेब्रुवारी 2011 मध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सचे 5000 शेअर घेतले असते तर त्यासाठी : 27 5000 शेअर = 1,35,000 रुपये द्यावे लागले असते. आज ते विकल्यावर 23 रुपये प्रतिशेअर तोटा होत आहे म्हणून एकूण तोटा : 23 5000 शेअर = 1,15,000 रुपये तोटा.
किंवा जर हे 5000 शेअर आपण विकले तर आपल्याला मिळतील :
आजचा भाव 4 5000 शेअर = 20,000 रुपये. म्हणजे आपल्या मूळ 1,35,000 रुपये गुंतवणुकीपैकी फक्त 20,000 रुपये आपल्या हातात येतील. शेअर मार्केटमध्ये जोखीम असते म्हणतात ती अशी.
समजा आपण टाटा स्टील व एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स दोन्हीत वर दिल्याप्रमाणे गुंतवणूक केली होती. मग एकत्रित परिणाम काय आहे?
टाटा स्टीलमधील नफा : 1,82,000 रुपये.
एमआयसी इलेक्ट्रॉनिक्समधील तोटा : 1,15,000 रुपये.
आपला नक्त नफा : 1,82,000 - 1,15,000 = 67,000 रुपये.
म्हणजे एमआयसी इलेक्ट्रॉनिक्समधील प्रचंड तोटा हिशेबात घेऊनही आपल्याला एकुणात नफा होत आहे. मात्र बँकेत मुदत ठेवीत पैसे ठेवले असते तर जास्त व्याज मिळाले असते. कसे ते पाहा :
टाटा स्टीलमधील 1,56,000 रुपयांवर चार वर्षात मिळणारे व्याज: 64,206 रुपये एमआयसी इ. तील 1,35,000 रुपयांवर दोन वर्षांत मिळणारे व्याज : 25,393 रुपये. एकूण व्याज 64,206 + 25,393 = 89599 रुपये. मात्र, शेअर्समधील गुंतवणुकीतून मिळणारा दीर्घकालीन नफा करमुक्त असतो, तर बँकेतून मिळणार्‍या व्याजावर कर द्यावा लागतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना योग्य शेअर निवडणे किती महत्त्वाचे आहे हे वरील उदाहरणांवरून लक्षात येईल. हे निवडण्याचे निकष इत्यादींची चर्चा करण्यापूर्वी पुढील लेखात आपण काही तांत्रिक बाबी जाणून घेऊ.