आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी विक्रीमुळे निर्देशांकाची घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - युरोप शेअर बाजारात आलेली नरमाई आणि काही बँकांनी तिस-या तिमाहीत केलेल्या खराब आर्थिक कामगिरीमुळे हैराण झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीमुळे सकाळच्या सत्रातील सगळी कमाई धुऊन निघून सेन्सेक्स 30 अंकांनी घसरून 19,751.19 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सलग तिस-या सत्रात सेन्सेक्सची घसरगुंडी झाली आहे. वास्तविक पाहता भांडवल बाजारात सातत्याने येत असलेला विदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि वाहन, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू आणि बॅँकांच्या समभागांची दणकून खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने 19,902 अंकांची कमाल पातळी गाठली होती, परंतु दुपारी युरोप शेअर बाजारातील नरमाईचा परिणाम होऊन विक्रीचा मारा सुरू झाला. दिवसअखेर सेन्सेक्स 30 अंकांनी घसरून 19,751.19 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 11.65 अंकांनी घसरून 5987.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांच्या मते, बाजार सकाळी सकारात्मक पातळीवर उघडला, परंतु नंतर झालेल्या विक्रीच्या मा-या मुळे सेन्सेक्स घसरला. युरोपातील नरमाईने तेजी हिरावून घेतली. बाजारात झालेल्या विक्रीचा सार्वजनिक कंपन्या, हेल्थ केअर, ऊर्जा, तेल आणि वायू तसेच धातू समभागांवर जास्त ताण आला.

आशियाई शेअर बाजारात तेजी
अमेरिकेतील रोजगार आणि निर्मिती क्षेत्रात चांगली वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम होऊन चीन, जपान, सिंगापूर, तैवान यांच्यासह बहुतांश आशियाई शेअर बाजारात तेजी आली, परंतु हॉँगकॉँग आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजार गडगडले. युरोप शेअर बाजारात मात्र नरमाईचे वातावरण होते.

टॉप गेनर्स : भेल, सिप्ला, स्टेट बॅँक, टाटा पॉवर, ओएनजीसी, स्टरलाइट, डॉ. रेड्डी लॅब, टाटा स्टील, कोल इंडिया, गेल, रिलायन्स, आयटीसी.
टॉप गेनर्स : एचडीएफसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बॅँक.