आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबल ऑपरेटर देणार ब्रॉडबँड सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारकडून 2020 पर्यंत 60 कोटी ब्रॉडबँड कनेक्शनचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यथासंभव प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने आता केबल ऑपरेटर्सची मदत घेण्याची योजना आखली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत लागू होणा-या नव्या युनिफाइड लायसन्स नियमांत दूरसंचार विभाग नवी तरतूद लागू करण्याची तयारी करत आहे. यानुसार ग्राहकांना केबल ऑपरेटर्सही ब्रॉडबँड कनेक्शन देऊ शकतील.


सध्या केबल ऑपरेटर्सला ब्रॉडबँड कनेक्शन देऊ शकत नाही. यासाठी त्यांना इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचे (आयएसपी) लायसन्स मिळवावे लागते. मात्र आता युनिफाइड परवान्याच्या मसुद्यातील दिशादर्शक अटींनुसार ब्रॉडबँड कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या वा आयएसपीसोबत केबल ऑपरेटर्स फ्रंचायझी करार करून इंटरनेट कनेक्शन देऊ शकतील. अवघ्या देशाला ब्रॉडबँडशी जोडण्यासाठी सरकार प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे अंथरत आहे. सप्टेंबरपर्यंत 10,000 ग्रामपंचायती ब्रॉडबँडसाठी तयार होतील. मात्र ग्राहकांना ब्रॉडबँड देण्यासाठी खासगी कंपन्यांची गरज असेल. प्रत्येक गावातील प्रत्येक घरात इंटरनेट सुविधा देण्यासाठी सध्याच्या केबल नेटवर्कचा पुरेपूर उपयोग करता येऊ शकतो, असे सरकारचे मत आहे. म्हणजेच टेलिकॉम किंवा आयएसपी कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यास तयार नसतील तर त्या सरकारकडून बँडविड्थ खरेदी करून केबल ऑपरेटरच्या माध्यामातून ग्राहकांना इंटरनेट सुविधा पुरवू शकतील.