आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CAD Pressure: Import Duty On Gold, Silver Hiked To 10%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने आयातीला शुल्कवाढीचा पाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वित्तीय तुटीचे नियंत्रण आणि रुपयाच्या अवमूल्यनाला वेसण घालण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांत झालेली ही तिसरी वाढ आहे.

चालू खात्यातील तूट यंदा 3.7 टक्क्यांपर्यंत नियंत्रणात ठेवण्यासाठी सोने आणि अनावश्यक वस्तूंच्या आयात शुल्कात वाढ करण्याचे संकेत वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारीच दिले होते. त्यानुसार तूट नियंत्रण आणि रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी यापुढे करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

वित्त मंत्रालयाच्या निर्णयानंतर आता स्टॅँडर्ड सोने आणि प्लॅटिनमवरील मूळ सीमाशुल्क 8 टक्क्यांवरून तर चांदीवरील हे शुल्क 6 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

केवळ इतकेच नाही तर सोने- चांदी या मौल्यवान धातूच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेले कच्चे सोने आणि कच्ची चांदी या कच्च्या मालावरील शुल्कदेखील 7 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. त्याचप्रमाणे कच्च्या सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या .999 शुद्धतेच्या सोन्याच्या विटेवरील अबकारी शुल्क 7 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर नेण्यात आले आहे. या शुल्कवाढीमुळे सोन्याच्या चोरट्या व्यापाराला चालना मिळेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.