आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car, Byeks Rate After Interim Budget 2014 News In Marathi

स्वस्ताईचा हंगाम: फोर्ड, टाटाच्या कार स्वस्त, जनरल मोटर्स, यामाहानेही घटवले वाहनांचे दाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हंगामी अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी वाहनांवरील अबकारी करात कपात केली. त्यामुळे विक्री घसरणीच्या घाटात अडकलेल्या वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे. परिणामी वाहन निर्मात्या कंपन्यांनी वाहनांच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. मारुती, ह्युंदाई, महिंद्रा, फोक्सव्ॉगन, निस्सानपाठोपाठ शुक्रवारी टाटा, फोर्ड, जनरल मोटर्सने कारच्या किमती घटवल्या, तर यामाहाने सर्व मोटारसायकलींचे दाम कमी केले. फोर्ड इंडियाने आपल्या सरसकट सर्व वाहनांच्या किमतीत 1.07 लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. फिगो, क्लासिक, इकोस्पोर्ट्स, फिएस्टा, एंडेव्हर या सर्व वाहनांसाठी ही किंमत कपात लागू असेल. यामाहा मोटार इंडिया कंपनीने मोटारसायकलच्या किमती 3066 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत.
टाटा मोटर्सची वाहने दीड लाख रुपयांपर्यंत स्वस्त : टाटा मोटर्सने वाहनाच्या स्वरूपानुसार 6,300 ते 69,000 रुपयांच्या र्शेणीत सर्व वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत. साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत या किमती कमी झाल्या आहेत.
व्यावसायिक वाहनेही स्वस्त : अबकारी कर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फोर्डने आपल्या आयशर ट्रक आणि बस या व्यावसायिक वाहनांच्या किमतीदेखील कमी करण्याचे ठरवले आहे. टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 15,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहेत.
जनरल मोटर्सने घटवल्या किमती : जनरल मोटर्स कंपनीनेही सर्व कार मॉडेलच्या किमती घटवल्या आहेत. जनरल मोटर्सच्या कार मॉडेलनिहाय 12,000 रुपये ते 49,000 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष पी. बालेंद्र यांनी शुल्क कपातीचे स्वागत केले असून यामुळे दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे.
यामाहाच्या दुचाकी स्वस्त
यामाहा मोटार इंडिया कंपनीने सर्व मोटारसायकलींच्या किमती 3066 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. नव्या किमती तत्काळ लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. किमतीत घट करण्याच्या या निर्णयामुळे यामाहा मोटारसायकली मॉडेलनिहाय 1033 रुपये ते 3066 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष रॉय कुरियन यांनी सांगितले, हंगामी अर्थसंकल्पात उत्पादन शुल्कात कपात झाल्याने विक्रीच्या आघाडीवर खडतर वाटचाल करणार्‍या वाहन क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

विविध कंपन्यांनी केलेली किंमत घट
टाटा : मॉडेलनिहाय 6300 ते 69,000 रुपये
जनरल मोटर्स : मॉडेलनिहाय 12,000 ते 49,000 रुपये
यामाहा : मॉडेलनिहाय 1033 ते 3066 रुपये
फोर्ड : फिगो : 23,399 रु., फोर्ड क्लासिक : 24,056, इकोस्पोर्ट्स : 25,947 रु., फिएस्टा : 32,961 रु., एंडेव्हर : 1,06,753 रु.