आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचे स्वप्न महागणार, रुपयाच्या अवमूल्यनाचा तोटा ग्राहकांकडून होणार वसूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाचे अवमूल्यन मोटार कंपन्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरू लागले आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ, नफ्यावर झालेला परिणाम लक्षात घेऊन आता टोयोटा, फोक्सवॅगन, फोर्ड या कंपन्या रुपयाच्या अवमूल्यनाचा तोटा ग्राहकांकडून वसूल करण्याचा विचार करू लागल्या आहेत. त्यामुळे कदाचित या कंपन्या ऑक्टोबर महिन्यात मोटारींच्या किमती वाढवण्याचे संकेत आहेत.


टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि विपणन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिंग म्हणाले : रुपयाचे अवमूल्यन असेच पुढे कायम राहिले तर ऑक्टोबरनंतर मोटारींच्या किमतीत वाढ करण्यावाचून पर्याय राहणार नाही. अलीकडेच कंपनीने आपल्या फॉर्च्युनर आणि कॅमरी या दोन्ही वाहनांच्या किमतीत एक टक्क्याने वाढ केली होती.


फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जोगिंदर सिंग यांनीदेखील त्यास दुजोरा देताना सांगितले की,उत्पादन खर्च आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ आणि त्यातच रुपयाचे अवमूल्यन याचा नफा क्षमतेवर परिणाम होत आहे. आतापर्यंत हा तोटा सहन केला, परंतु आता तो सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा भार ग्राहकांच्या खांद्यावर टाकण्याचा विचार आहे. रुपयाच्या अवमूल्यनाचा नफा क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याने लवकरच किंमत वाढवण्याबाबत विचार करण्यात येईल. त्याचा अंतिम निर्णय 10 ऑक्टोबरला घेण्यात येईल, असे फोक्सवॅगन ग्रुप सेल्स इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना यांनी स्पष्ट केले.


‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात या सर्वच मोटार कंपन्यांच्या अधिका-यांनी रुपयाच्या घसरणीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना किमती वाढवणे अपरिहार्य झाले असल्याचे स्पष्ट केले.


सणांचा हंगाम खडतर
कार विक्रीसाठी सणांचा हंगाम महत्त्वाचा मानला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या काळातील मुहूर्तावर कार खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. यंदा मात्र सणांचा हंगामही खडतर असल्याचे मत प्रमुख कार कंपन्यांनी व्यक्त केले. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (ऑटो) पवन गोयंका यांनी सांगितले, यंदा सणांचा हंगाम नरम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या ऑगस्ट आणि जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कार विक्रीत घट झाली आहे. टोयोटा किर्लोस्करचे उपव्यवस्थापकीय संचालक संदीप सिंग यांनीही असेच मत व्यक्त केले.


मागणी कमी, योजनांवर परिणाम
सध्याच्या आर्थिक मंदीचा वाहन उद्योगातील कंपन्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ लागला आहे. फोक्सवॅगनचे सक्सेना म्हणाले की, सध्या मागणीच कमी असल्याने वाहनांच्या किमती वाढवणे तितकेही सोपे नाही. पण सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूक योजना निर्णयाचा मात्र फेरआढावा घ्यावा लागेल. ‘किर्लोस्कर’चे संदीप सिंग यावर म्हणाले की, मोठी कॉर्पोरेट कंपनी असल्याने एक वा दोन वर्षांचा नाही तर दीर्घकाळाचा विचार करून गुंतवणूक योजना आखल्या जातात. त्यामुळे या योजना गुंडाळण्याचा विचार करता येत नाही. मोटार स्पर्धेसाठी आखलेल्या मोठ्या योजना मात्र कमी कराव्या लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.


रुपया बळकटीसाठी फक्त घोषणा
रुपया आणि घसरत्या बाजाराला संजीवनी देण्यासाठी सरकारने अलीकडेच केलेल्या उपायोजनांबद्दल मत व्यक्त करताना संदीप सिंग म्हणाले की, या दोन्हीबाबतीत काहीही होताना दिसत नाही. सरकारकडून घोषणा होत असल्या तरी याची अंमलबजावणी मात्र होत नाही.