आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार विक्रीचा रिव्हर्स गिअर कायम, सलग आठव्या महिन्यात घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन उद्योगावर आलेले मंदीचे मळभ दूर होण्याचे सध्या तरी कोणतेच चिन्ह दिसत नाही. अर्थव्यवस्थेतील मंदी, ग्राहकांची ढासळलेली मानसिकता, व्याजाचे चढे दर यामुळे जूनमध्ये सलग आठव्या महिन्यात वाहनांची विक्री 9 टक्क्यांनी घसरली आहे. वाहन उद्योगाच्या विक्रीचे चाक वेगाने फिरण्यासाठी केंद्र सरकारने वाहन उद्योगाला आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे मत ‘सियाम’ या वाहन क्षेत्राचे नेतृत्व करणा-या संस्थेने व्यक्त केले आहे.


एप्रिल महिन्यात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजाच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीतील वाहनांच्या विक्री आकडेवारीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दुचाकी क्षेत्र वगळता अन्य सर्व गटांतील वाहनांच्या विक्री वाढीचे लक्ष्य गाठणे शक्य नाही. परिणामी सियामने विक्रीच्या आकडेवारीचा फेररचित अंदाज व्यक्त करण्यापासून दूर राहण्याचे पसंत केले आहे. सियामच्या जून महिन्यातील ताज्या आकडेवारीनुसार मोटारींची विक्र्री अगोदरच्या वर्षातील याच महिन्यातील 1,53,450 मोटारींवरून घसरून 1,39,632 वाहनांवर आली आहे. अर्थसंकल्पामध्ये अबकारी शुल्क 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवल्याचा फटका प्रामुख्याने उपयोगिता वाहनांना बसला आहे. मालकी तत्त्वाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने खरेदीदारदेखील प्रवेश पातळीवरील वाहने खरेदी करणे टाळत असल्याचे माथूर म्हणाले.

एप्रिलमध्ये प्रवासी मोटारींच्या विक्रीत तीन ते पाच टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता; परंतु त्या तुलनेत एप्रिल ते जून या कालावधीत स्थानिक बाजारपेठेतील मोटारींची विक्री 10.41 टक्क्यांनी घसरली आहे. दुचाकींची विक्रीही घटली. 6 ते 8 टक्क्यांच्या तुलनेत 0.82 टक्क्यांनी घसरली असून व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सात ते आठ टक्के वाढीच्या अंदाजाच्या तुलनेत याच कालावधीत 8.12 टक्क्यांनी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा फेररचित वाहन विक्रीचा आढावा व्यक्त करण्यात आता तरी अर्थ नाही. दुचाकी वगळता अन्य वाहनांच्या सर्व विभागांमध्ये एप्रिल महिन्यात व्यक्त करण्यात आलेला वाढीचा अंदाज साध्य करणे अशक्य असल्याचे मत माथूर यांनी व्यक्त केले. दुचाकींची 50 टक्के विक्री ग्रामीण भागावर अवलंबून आहे. यंदा पाऊस चांगला म्हणजे सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त झाल्याने त्याचा विक्रीवर सकारात्मक परिणाम होण्याचा आशावाद माथूर यांनी व्यक्त केला. व्यावसायिक वाहनांनीदेखील मोठ्या प्रमाणावर निराशाजनक कामगिरी केली आहे. अर्थव्यवस्थेतील मरगळीचे वातावरण आणि मालवाहतुकीत आलेल्या अडचणींमुळे व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सलग पंधराव्या महिन्यात घसरण झाली असल्याकडे माथूर यांनी लक्ष वेधले.


मोटारसायकलींच्या विक्रीचा सूर असा
-दुचाकींच्या एकूण विक्रीमध्ये 4.56 टक्क्यांनी घट झाली असून ती अगोदरच्या वर्षातील 11,69,741 वाहनांवरून 11,16,424 वाहनांवर आली आहे.
-तीनचाकी वाहनांची विक्री 8.71 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातील 42,081 वरून 38,414 वाहनांवर आली आहे.
-व्यावसायिक वाहनांची विक्री 13.45 टक्क्यांनी घसरून 64,928 वाहनांवरून 56,197 वाहनांवर.
-सरसकट सर्व विभागांतील वाहनांची विक्री 5.10 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातील 14,83,443 वाहनांवरून यंदाच्या जूनमध्ये 14,07,767 वाहनांवर आली आहे.


कंपन्यांची कामगिरी
मोटारसायकल कंपनी जून 2013 घट
हीरो मोटोकॉर्प 4,39,845 10.14 %
बजाज ऑटो 1,59,688 24.5 %
होंडा मोटारसायकल 1,13,700 + 19.28%
मोटार कंपनी जून 2012 जून 2013 घट
मारुती सुझुकी 70,977 65,172 8.17%
ह्युंदाई मोटर 30,363 30 ,577 किरकोळ वाढ
टाटा मोटर्स 13,595 9,628 29.17 %
महिंद्रा अँड महिंद्रा 19,348 15,916 17.17 %