आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी वाहनांत कारचे तंत्रज्ञान; 'हीरो'चा नावीन्यावर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकाऊ- होंडापासून विभक्त झाल्यानंतर हीरो मोटार कॉर्पने संशोधन आणि विकासावर आता लक्ष केंद्रित केले असून मोटारींमध्ये पाहायला मिळणारे तंत्रज्ञान आता हीरोच्या दुचाकी वाहनांमध्ये वापरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुचाकींची स्टार्ट-स्टॉप प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक इम्मोबिलायझरमध्ये हीरो लवकरच कार तंत्रज्ञानाच्या काही फिचर्सचा समावेश करणार आहे.

ही सर्व नावीन्यपूर्ण यंत्रणा हीरोच्या संशोधन आणि विकास विभागाने स्वत: विकसित केली आहे. होंडाच्या मागील करारातील निर्बंधांमुळे हीरोला पूर्ण क्षमतेने संशोधन आणि विकास क्षमता विकसित करता आली नव्हती. 2010 मध्ये हा करार संपला. आमच्या मुलांमध्ये काय क्षमता आहे हे दाखवण्याची संधीच मिळाली नव्हती, परंतु आता ती संधी त्यांना मिळाली आहे, असे हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी संचालक पवन मुंजाल म्हणाले.

दुचाकींच्या किमती घटणार
आय 3 एस तंत्रज्ञानामुळे हीरोला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी तर मिळालीच शिवाय या तंत्रज्ञानामुळे हीरोच्या दुचाकी ग्राहकांना कमी किमतीत मिळण्यासही मदत होणार आहे.
-पवन मुंजाल, व्यवस्थापकीय संचालक, हीरो मोटो कॉर्प

सर्व दुचाकींमध्ये आय 3 एस तंत्रज्ञान
हीरोच्या ‘आय स्प्लेंडर’ या दुचाकीमध्ये आय 3 एस ही स्टार्ट-स्टॉप प्रणाली वापरण्यात आली आहे. आय 3 एस तंत्रज्ञानासाठी हीरोने पेंटटसाठी अर्ज केला असून लवकरच हे तंत्रज्ञान सर्व दुचाकींमध्ये वापरले जाणार आहे.

इंधन बचतीची यंत्रणा
आघाडीच्या कारमध्ये मायक्रो हायब्रीड म्हणून ओळखली जाणार्‍या इंजिनच्या स्टार्ट- स्टॉप प्रणालीत गरज नसताना इंजिन आपोआप बंद होते व गरजेनुसार सुरू होते. त्यामुळे इंधनाची बचत तर होतेच शिवाय उत्सर्जनही कमी होते.

स्कूटरला एकच ब्रेक हँडल
एकीकृत ब्रेक प्रणालीने (आयबीएस) सज्ज असलेल्या स्कूटरही हीरो लवकरच बाजारात आणणार आहे. आयबीएसमध्ये फ्रंट आणि रिअर व्हीलसाठी एकच ब्रेक हँडल वापरण्यात येते.

दुचाकी चोरीला चाप
इलेक्ट्रॉनिक इम्मोबिलायझर हे एक सुरक्षा उपकरण असून त्यामुळे योग्य चावी शिवाय कोणत्याही परिस्थितीत इंजिन सुरूच करता येत नाही.