आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या महिन्यांत कर नियोजनाची चिंता हाच विषय असतो. करकपातीच्या कक्षेत येणारे चाकरमानी शेवटच्या दिवसापर्यंत कर वाचवणा-या पर्यायांचा शोध घेत असतात. मात्र, कर बचतीच्या विविध घटकांबाबत सविस्तर माहिती व त्याचे लाभ जाणून घेण्यातच खरे शहाणपण आहे. ही साधने व त्यांच्या फायद्याविषयी...
1. आयुर्विमा : याद्वारे दरवर्षी प्रीमियम जमा करून कर बचत साधता येते. कर बचतीत एक एप्रिल 2012 पासून झालेल्या बदलानुसार बेस कव्हरेज प्रीमियमच्या 10 पटीहून कमी असेल तर कर बचतीचा लाभ मिळणार नाही. पॉलिसीच्या मुदतीपर्यंत ही अट लागू आहे. कर बचतीच्या दृष्टीने पॉलिसी घेण्याचा निर्णय घाई गडबडीत घेऊ नका.
2. ईएलएसएस : इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमसुद्धा चांगला परतावा देणा-या कर बचतीचे चांगले माध्यम आहे. गुंतवणुकीची सुटसुटीत व थेट पद्धत आणि तीन वर्षांचा लॉक इन कालावधी ही यामागची कारणे आहेत. गेल्या काही वर्षांतील शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे याचे आकर्षण काहीसे कमी झाले आहे. मात्र, बाजाराची चांगली माहिती असणा-या ंसाठी आजही ईएलएसएस हे कर बचतीचे उत्तम साधन आहे.
3. अल्पबचत : दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी-पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हे एक चांगले साधन आहे. यात गुंतवलेली रक्कम, त्यावरील व्याज आणि मुदतीनंतर मिळाणारी रक्कम करमुक्त असते. एक डिसेंबर 2011 पासून याचे व्याजदर बाजाराशी निगडित केले आहेत. तरीही कर बचतीसाठी हा चांगला पर्याय आहे. एनएससी किंवा पोस्टातील गुंतवणूक या इतर अल्पबचतीच्या साधनात गुंतवणूक करणे सुलभ आहे. मात्र, यावर मिळणा-या व्याजावर कर लागतो. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांसाठी हे फायदेशीर ठरत नाही.
4. एनपीएस : न्यू पेन्शन स्कीम आता सर्वांसाठी खुली आहे. निवृत्तीनंतरचे नियोजन करू न शकणा-या गुंतवणूकदारांसाठी हे चांगले साधन आहे. नियोक्त्याकडून होणा-या काँट्रिब्युशनशिवाय अतिरिक्त कर बचत हे या साधनाचे वैशिष्ट्य आहे.
5. एफडी : फिक्स्ड डिपॉझिट (मुदत ठेवी) हे कर बचतीचे सर्वात सुलभ साधन आहे. मात्र, यावरील व्याज करमुक्त नसते. लोअर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणा-या ंसाठी हा पर्याय उत्तम आहे.
6. आरोग्य विमा : याद्वारे 80 सीपेक्षा अधिक कर बचतीचा लाभ मिळतो. गरजेनुसार आरोग्य विमा उतरवणे केव्हाही उत्तम. यात कर बचतीचा अतिरिक्त फायदा मिळतो.
7.आरजीईएसएस: रीजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम कर बचतीचा नवा पर्याय आहे. ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही, अशांसाठी ही योजना आहे. यात 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवलेल्या रकमेच्या 50 टक्के रकमेवर कर बचतीसाठी लाभ मिळतो. मात्र, ही योजना शेअर बाजाराशी निगडित
असल्याने यात जोखीम आहे.कर नियोजन हे आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे. यावर आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासूनच हे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत होणारी धावपळ टाळता येईल आणि आर्थिक दबाव येणार नाही.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक
असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
jp.solanki@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.