आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटार कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये टाकला विक्रीचा टॉप गिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑगस्ट महिन्यापासून वाहन उद्योगाने टाकलेला विक्रीचा टॉप गिअर सप्टेंबर महिन्यातही कायम राहिला आहे. न पेक्षा मोटार विक्रीने तुफान वेग घेतला असून या महिन्यात सर्वाधिक 1,56,018 मोटारींची विक्री झालेली आहे. गेल्या नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ मरगळीनंतर वाहन बाजारात ऐन सणासुदीच्या तोंडावर तेजी आल्यामुळे वाहन कंपन्याही सुखावल्या आहेत.


चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मोटारींच्या विक्रीत 4.67 टक्क्यांची घट झाली आणि 2002 - 03 पासून मोटार उद्योगासाठी अतिशय वाईट असा घसरणीचा काळ होता. 2002 -03 मध्ये याच कालावधीत मोटार विक्रीत लक्षणीय 6.96 टक्क्यांनी घट झाली होती. देशातील प्रवासी मोटारींची विक्री सप्टेंबर महिन्यात 0.73 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 1,54,884 मोटारींवर गेली आहे.


मोटारी, प्रवासी वाहने, उपयोगिता वाहने आणि दुचाकी या सर्वच वाहन प्रकारांनी सप्टेंबर महिन्यात चांगली विक्री कामगिरी केली आहे. या वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी असून हा कल असाच कायम राहण्याचा आशावाद ‘सियाम’चे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी व्यक्त केला आहे.


तेजीचा आलेख कायम ठेवणे आव्हानात्मक :
देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रवासी मोटारींमधील ही सकारात्मक वाढ यंदाच्या आर्थिक वर्षात कायम राहण्याची शक्यता कमी असल्याचा सावध इशारा देतानाच किर्लोस्कर पुढे म्हणाले, चढे व्याजदर, महागाई आणि इंधनांच्या वाढलेल्या किमती याचा ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. एकप्रकारे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वाहन उद्योगातील उत्पादक आणि वितरकांना सुट्या भागांचा पुरवठा करणा-या कंत्राटी कामगारांपासून ते अगदी प्रशिक्षणार्थी कामगारांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाल्याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले. सप्टेंबरमधील विक्रीचा बाजारावर सकारात्मक परिणाम होणार का, असे विचारले असता किर्लोस्कर म्हणाले की, चांगला पाऊस झाल्यामुळे काही प्रमाणात सकारात्मक वातावरण आहे. तरीपण त्याबद्दल सांगणे कठीण आहे.


तुलनात्मक वाहन विक्री
कंपनी सप्टेंबर 2012 सप्टेंबर 2013 वाढ/घट
मारुती सुझुकी 68,957 78,975 14.52 %
ह्युंदाई मोटर इंडिया 30,795 30,850 --
टाटा मोटर्स 17,133 9,766 - 42.99 %
महिंद्रा अँड महिंद्रा 22,019 18,019 - 19.09 %