आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या विक्रीची गाडी मंदीच्या गावाकडे, सलग आठव्या महिन्यातही विक्रीचा झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कारच्या विक्रीची गाडी जूनमध्ये सलग आठव्या महिन्यातही घसरणीच्या गावाला आली आहे. जूनमध्ये कार विक्रीला ग्राहकांनी थंड प्रतिसाद दिला. वाहन क्षेत्रातील मारुती-सुझुकी, टाटा मोटर्स, टोयोटा आणि जनरल मोटर्स या दिग्गज कंपन्यांना पुन्हा एकदा घसरणीचा रेड सिग्नल दिसला. सलग आठ महिन्यांत विक्रीच्या मार्गावर घसरणीचे धक्के सहन करणा-या ऑटो क्षेत्राची वाटचाल मंदीच्या गावाकडे चालली असल्याचे मत व्यक्त होत आहे.


आघाडीच्या कंपन्या विक्रीचे धक्के सहन करत असताना होंडा कार्स इंडियाने मात्र जूनमध्ये विक्रीची तिप्पट वाढ नोंदवली. कंपनीने नुकत्याच बाजारात आणलेल्या अमेझ या सेडानच्या जोरावर ही कामगिरी बजावली आहे. वाहन बाजारात मंदी आणि नकारात्मक संकेत असतानाही ह्युंदाई आणि फोर्ड इंडियाने चांगली विक्री साधली.


गेल्या वर्षी जूनमध्ये 83,531 कारची विक्री करणा-या मारुतीच्या विक्रीची गाडी यंदाच्या जूनमध्ये 77,002 कारपर्यंतच धावू शकली. मारुतीच्या विक्रीत 7.8 टक्के घट झाली. मारुतीच्या छोट्या कारच्या विक्रीत 8.4 टक्के घट झाली.यात एम-800, ए-स्टार, अल्टो आणि वॅगन आर यांचा समावेश आहे, तर कंपनीच्या कॉम्पॅक्ट कारची ( इस्टिलो, स्विफ्ट आणि रिटझ) विक्री 7.2 टक्क्यांनी घटली, तर डिझायर कारच्या विक्रीत 8.7 टक्के घट झाली.


देशातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सलाही विक्री घटीचा धक्का बसला. गेल्या वर्षीच्या जूनमधील विक्रीच्या तुलनेत यंदा टाटाची वाहन विक्री 31.54 टक्क्यांनी घसरली आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटार कंपनीच्या विक्रीत 19.45 टक्के घट झाली. महिंद्रा अँड महिंद्राची विक्री 7.04 टक्क्यांनी घटली. जनरल मोटर्सलाही घसरणीचा फटका बसला. जनरल मोटर्सच्या जूनमधील विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.71 टक्के घसरण दिसून आली.


फोर्ड इंडियाच्या वाहन विक्रीत 14 टक्के वाढ झाली. फोक्सवॅगन इंडियाच्या वाहन विक्रीत जूनमध्ये किंचित घट झाली.
दुचाकी विक्रीत आघाडी
० मोटारसायकल निर्मितीतील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर्सची विक्री 7.14 टक्क्यांनी घटली.
० होंडा मोटारसायकल अँड स्कूटर्सच्या विक्रीत 11.09 टक्के वाढ दिसून आली.
० यामाहा मोटार इंडियाच्या मोटारसायकल विक्रीत 46.26 टक्के वाढ झाली.


मंदीचे सावट
बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेतील मंदीची स्थिती कायम आहे. त्याचा फटका वाहन उद्योगाला बसतो आहे.
संदीप सिंह, सीओओ, टोयोटा किर्लोस्कर


रुपयाचा फटका
जूनमध्ये पुन्हा एकदा विक्रीच्या आघाडीवर घसरण आहे. रुपयाचे अवमूल्यन, इंधनाच्या किमती याचा फटका ऑटो क्षेत्राला बसला आहे. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) वरील वाढीव आयात शुल्काच्या भाराने वाहन क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.
पवन शाह, चीफ एक्झिक्युटिव्ह, महिंद्रा अँड महिंद्रा


चढे व्याजदर व अस्थैर्याचा परिणाम
चढ्या व्याजदरामुळे महागलेले कर्ज आणि इंधनाच्या सातत्याने वाढत्या किमती यामुळे वाहन उद्योग संकटात सापडला आहे. त्यातच विक्रीच्या पातळीवर अनेक कंपन्यांच्या गाड्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने चिंता वाढली आहे. पी. बालेन्द्र, उपाध्यक्ष, जनरल मोटर्स