आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cashless Transactions Could Solve Black Money Problem: PM Narendra Modi

लोकांची सोने खरेदीची सवय मोडा, पंतप्रधान मोदींचे सर्व बँकांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुरक्षितता, भविष्यातील अडचणींचा विचार करता सोने हेच संकटकाळी कामाला येऊ शकते, अशी आजही भारतीयांची मानसिकता कायम आहे. ही मानसिकता बदलतानाच जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचे मोठे आव्हान बँकांसमोर आहे. हे आव्हान बँकांनी पेलले तर भारतीय सोने खरेदी न करता बचतीसाठी अन्य मार्ग चोखाळू शकतील. बँकांनी हा सामाजिक बदल घडवून आणण्याची ही नवी भूमिका वटवली तर देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडून येण्यास मदत होऊ शकेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

आयसीआयसीआय समूहाच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. आयसीआयसीआय समूहाने हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त गुजरातमधील अकोदरा गावात डिजिटल शाखा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. या शाखेचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. राज्यपाल विद्यासागर राव, अर्थमंत्री अरुण जेटली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर या वेळी उपस्थित होत्या. मोदी म्हणाले,भारत, चीन आणि आसपासच्या भागात आजही बचतीच्या सवयीला परंपरागत महत्त्व दिले जाते. अन्य देशांमध्ये मुलांनाही क्रेडिट कार्डाची सवय आहे. परंतु आपल्याकडे सोन्याची खरेदी केलेली बचतपुंजीच आपल्याला संकटकाळी कामी येईल, असा विचार केला जाते. पण अडीअडचणीच्या काळात सोने विकून पैसा उभा करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. या बचत करणार्‍या वर्गामध्ये बँकांनी विश्वासार्हता निर्माण करून सोने नाही तर पैशाच्या बचतीचे धडे दिले तर सोन्यातील गुंतवणूक कमी होऊन बँकेचे व्यवहार वाढतील.
त्यासाठी बँकांनी पुढाकार घेऊन यापुढे सामाजिक बदल घडवणार्‍या या नव्या क्षेत्राचा विचार करण्याची नितांत गरज असल्याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागातील लोकांना आता प्रतीक्षा करण्यासाठी वेळ नाही. त्यांनाही आता शहरी लोकांप्रमाणे जीवनशैली जगण्याचे वेध लागलेत असून त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.

स्वच्छता अभियानाचे कौतुक :
आयसीआयसीआय बँकेच्या सर्व शाखांमध्ये यशस्वीपणे राबवल्या गेलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतुक करून पंतप्रधान पुढे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थान, सांडपाणी निचरा व्यवस्थापन या सारख्या क्षेत्रांप्रमाणेच आता स्वच्छता व्यवस्थापन हे एक नवे क्षेत्र म्हणून पाहिल्या जाण्याची गरज आहे. यावरील क्षेत्रांप्रमाणेच स्वच्छता क्षेत्रातही बँकांच्या आर्थिक सहकार्यातून नवे उद्योजक घडवता येतील. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेने पुढाकार घेऊन किमान एक लाख स्वच्छता उद्याेजक तयार करण्यास प्रोत्साहन दिले, तर ते देशाच्यादृष्टीने एक माेठे काम ठरेल, असेही मोदी म्हणाले.
कॅशलेस व्यवहारावर भर हवा
आयसीआयसीआय बँकेच्या पुढाकारामुळे गुजरातमधील अकोदरा गावात आता कॅशलेस व्यवहार होणार आहेत. परंतु संपूर्ण देशभरातच कॅशलेस अर्थव्यवस्था निर्माण व्हावी. अधिकाधिक कॅशलेस व्यवहार होण्याच्यादृष्टीने भारतीय बँकांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, अशी आपली इच्छा आहे. कारण त्यामुळे सर्व व्यवहारांचा मागोवा घेता येऊन देशात फिरणार्‍या काळ्या पैशाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

(फोटो : आयसीआयसीआय बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना बँकेच्या सीएमडी चंदा कोचर. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. छाया : संदीप महाकाल)