आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्य:स्थितीत बदला गुंतवणुकीचे धोरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉलरच्या तुलनेत रुपया 60 च्या पातळीत पोहोचला आहे. चालू खात्यातील वित्तीय तूट फुगत चालली आहे. सरकारच्या खाद्यान्न सुरक्षा कायद्यानंतर वित्तीय तुटीची काय स्थिती असेल हे अद्याप स्पष्ट नाही. नजीकच्या काळात प्रमुख व्याजदरात कपात न करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. आर्थिक स्थितीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाहीत. मात्र, या परिस्थितीचा आपल्या व्यक्तिगत गुंतवणुकीवर होणारा परिणाम आपण निश्चित कमी करू शकतो. जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा त्यात योग्य नियोजन आणि ठरावीक उद्दिष्टासह गुंतवणूक करणे योग्य ठरते. या समीकरणानुसार गुंतवणूक केल्यास नजीकच्या काळात येणा-या चढ-उतारापासून आपली दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित राखता येईल. आपल्या गुंतवणुकीतून भरघोस परतावा पदरी पाडून घ्यायचा असेल तर काही बाबींचे पालन करणे आवश्यक ठरते. त्या बाबी अशा...
1. खर्चावर नियंत्रण : रुपयातील घसरण अशीच सुरू राहिली तर आपला मासिक खर्च निश्चित वाढणार आहे. रुपयाच्या घसरणीचा महागाईवर तत्काळ परिणाम होतो. कारण यामुळे कच्च्या तेलाची आयात महागते व अनेक वस्तूंच्या वितरणाचा खर्च वाढून आपला किराणा महागतो. हा धोका लक्षात घेऊन आपल्या बजेटनुसार खर्चाचे नियोजन करणे केव्हाही चांगले. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास कुटुंबाच्या मासिक खर्चाची पूर्तता करण्यास अडचण येणार नाही. त्याबरोबरच अडचणीच्या काळासाठी योग्य ती रक्कम मागे शिल्लक राहील.
2. डेट फंड : मागील काही महिन्यांत कर्जरोख्यांवर आधारित फंडांनी (डेट फंड) चांगला परतावा दिला आहे. महागाई वाढण्याची शक्यता आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात न करण्याचे संकेत यामुळे सरकारी रोख्यांवरील व्याजदर वाढत आहेत. एखाद्याने शॉर्ट टर्मसाठी दीर्घ अवधीच्या डेट फंडात गुंतवणूक केली असेल तर त्याने ही गुंतवणूक शॉर्ट टर्म फंड किंवा डायनॅमिक फंडात वळवावी. पोर्टफोलिओतील बदलासाठी हे फंड योग्य असतात. दीर्घकाळाचे उद्दिष्ट असेल तर सध्याची गुंतवणूक जैसे थे ठेवून सर्व निर्णय फंड व्यवस्थापकाकडे सोपवावेत. सध्या बंद मुदतीच्या दीर्घकालीन योजनांत (क्लोज एंडेड लाँग टर्म प्रॉडक्ट) गुंतवणूक करणे टाळावे. तसेच योग्य असेट अलोकेशनसह सतर्कतेने गुंतवणूक केल्यास, ओपन एंडेड फंड कराचा विचार केल्यास चांगला परतावा मिळवता येईल.
3. इक्विटी फंड : सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता एकरकमी मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचे आहे. त्यामुळे मोठी रक्कम इक्विटी फंडात गुंतवणे टाळा. बाजारात उपलब्ध असलेल्या पद्धतशीर गुंतवणूक योजना (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा वापर करा. यामुळे केवळ बाजाराच्याच नव्हे तर जोखमीची सरासरी राखण्यात मदत होईल. भले आपले उद्दिष्ट जरी दीर्घकालीन असले तरी या धोरणामुळे आपल्या परताव्यावर फारसा परिणाम होणार नाही.


आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या आधारावर कोणत्याही उत्पादनाची निवड किंवा त्यात गुंतवणूक करण्याचे धोरण आखू नका. आपले लक्ष्य आणि जोखमीची क्षमता याकडे दुर्लक्ष करू नका. हे लक्षात घेऊनच योग्य असेट अलोकेशनला प्राधान्य द्या.


लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.