आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनच्या आक्रमणाने सायकल उद्योगाचे टायर पंक्चर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चीनवरून स्वस्त सायकलींची वाढती आयात स्थानिक सायकल उद्योगासाठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत 41 टक्क्यांनी ही आयात वाढल्यामुळे देशातील सायकल उद्योगाला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे असोचेम या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

चीनच्या आयातीला वेसण घालण्याबरोबरच मुक्त व्यापार कराराचा फेरआढावा घेऊन सायकली आणि सुट्या भागांच्या आयातीला आळा घालण्यासाठी अँटी डंपिंग शुल्क आकारावे, अशी मागणी असोचेमने केली आहे. सायकली आणि तिच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात वाढ केल्यास भारत आणि चीन या दोन्ही देशांत तयार होणार्‍या सायकलींच्या किमती जागतिक बाजारपेठेत समान पातळीवर येऊ शकतील, असे मत ‘भारतीय सायकल उद्योगाचे भवितव्य’ या असोचेमच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले आहे.

सध्या सायकलीच्या सुट्या भागांवर 20 टक्के आणि सायकलीवर 30 टक्के आयात शुल्क आकारण्यात येते, असे असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले. रावत म्हणाले, गेल्या 5 वर्षांत चीनवरून सायकली आणि सुटे भाग आयातीचे प्रमाण 41 टक्क्यांनी वाढले आहे.