आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक आर्थिक संकटात ड्रॅगनची भर पडण्याची चिन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - युरोप व अमेरिकेवर असलेली आर्थिक मरगळीची छाया चीनमुळे अधिक गडद झाली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवरही मरगळ येत असल्याचे संकेत मिळत असल्याने हे संकट अधिक गंभीर झाले आहे. चीन व भारताला जागतिक विकासाचे इंजीन म्हटले जाते. त्यामुळे या दोन देशांत आर्थिक मरगळ येणे ही गंभीर समस्या मानले जात आहे.
भारतात आर्थिक विकासाचा वेग यापूर्वीच मंदावला आहे. त्यापाठोपाठ आर्थिक जगताला आता चीनच्या अर्थव्यवस्थेकडून नकारात्मक संकेत मिळत आहेत. चीनमधील अनेक कारखान्यांतून उत्पादीत माल विक्रीअभावी पडून आहे. अशा मालाचा गोदामातील साठा वाढतो आहे. ग्राहकीअभावी माल पडून राहत असल्याचे स्पष्ट आहे. चीनमधील अनेक कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे. चीनमधील इलेक्ट्रॉनिक्स तसेच क्रीडा पोशाखाच्या तसेच विमान कंपन्यांनीही नफ्यात घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चीनच्या निर्यातीचे प्रमाणही घटत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व लक्षणांवरून चीनमध्ये आर्थिक मरगळ आल्याचेच स्पष्ट होत आहे.
विकासाच्या निकषांवर चीनच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्यास, त्याचा निष्कर्षही चिंताजनक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर 8.1 % होता. दुस-या तिमाहीत त्यात घट होऊन दर 7.6 % झाला. 2010 व 2011 या दोन वर्षांसाठी चीनचा आर्थिक विकास दर अनुक्रमे 10.4 % व 9.2 % होता. मात्र तरीही 2012 वर्षासाठी चीनने आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट 7.5% निर्धारित केले आहे. चीनमध्ये आर्थिक विकासाचा वेग मंदावत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणा-या अनेक तज्ज्ञांनी याकडे लक्ष वेधत चीनची आर्थिक मरगळ युरोपीय कर्ज संकटापेक्षा अधिक चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धातूंसह इतर अनेक वस्तूंचा चीन हा प्रमुख आयातकर्ता देश आहे. मोठ्या प्रमाणावर होणा-या या आयातीच्या जोरावर जागतिक विकासाला वेळोवेळी ऊर्जा मिळत असते. मात्र, आर्थिक मरगळ आल्याने या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे फक्त युरोपच नव्हे, तर चीनची अर्थव्यवस्था सावरण्याची गरज आहे. अनेक गुंतवणूकदारांनीही भारत व ब्राझील पाठोपाठ चीनच्या ढासळत्या आर्थिक विकास दराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये स्टिम्युलस पॅकेजच्या घोषणेची हे गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. दिलासायुक्त पॅकेज मिळाले तर अर्थव्यवस्थेला टेकू मिळू शकतो.
आर्थिक मरगळीची लक्षणे
* कारखान्यांमधील उत्पादित माल ग्राहकीअभावी पडून
* इलेक्ट्रॉनिक्स व विमान कंपन्यांच्या नफ्यात घट होण्याचे संकेत
* निर्यातीच्या प्रमाणात सतत घसरण सुरूच; त्याचा परिणाम उत्पादन क्षेत्रावर
* रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण घटले. त्यामुळे आगामी काळात बेरोजगारी वाढण्याचा धोका