विकसनशील बाजारपेठांत स्वस्त / विकसनशील बाजारपेठांत स्वस्त मोबाइलला पहिली पसंती

Apr 04,2014 02:35:00 AM IST


नवी दिल्ली- मोबाइल हँडसेट आणि टॅब्लेट्सचा जागतिक बाजार आता बदलाच्या वळणावरून जात आहे. ग्राहकांचा कल बदलल्याचा हा परिणाम आहे. या क्षेत्रात संशोधन करणार्‍या गार्टनर या संस्थेने या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार परिपक्व बाजारातील (विकसित) ग्राहक आता मध्यम श्रेणीतील प्रीमियम मोबाइल हँडसेटला प्राधान्य देत असून विकसनशील बाजारपेठांत खरेदीदार कमी किमतीच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत.

गार्टनरच्या मते, कमी किंमत आणि जास्त मूलभूत सोयी असलेल्या डिव्हाइसेसकडे ग्राहकांचा ओढा दिसतो आहे. यंदा पर्सनल कॉम्प्युटर (पीसी), अल्ट्रा मोबाइल्स, मोबाइल हँडसेट फोन आणि टॅब्लेट्ससह डिव्हाइस बाजार विकासाच्या वाटेवर येण्याचा अंदाज आहे. जगभरात यावर 68,900 कोटी डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च 4.4 टक्के जास्त असेल. जास्त किमतीच्या प्रीमियम फोनची मागणी घटली आहे. विकसित देशांच्या बाजारपेठांत मध्यम श्रेणीतील हँडसेटना, तर विकसनशील देशांतील बाजारपेठांत स्वस्तातील अँड्राइड हँडसेटला मागणी वाढते आहे. गार्टनरने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 2014 मध्ये डिव्हाइसेसची विक्री 250 कोटी युनिटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2013 मधील डिव्हाइसेसच्या विक्रीच्या तुलनेत हे प्रमाण 6.9 टक्के जास्त राहील. 2013 मध्ये 2012 च्या तुलनेत डिव्हाइस विक्रीत 4.8 टक्के वाढ झाली होती.

गार्टनर मॅनेजिंगचे उपाध्यक्ष रिचर्ड गार्डन यांनी सांगितले, 2014 मध्ये विविध उपकरणे खरेदीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून स्वस्त किमतीत जास्त सुविधा मिळवण्याकडे ग्राहकांचा कल राहील. पारंपरिक पीसीचा वापर करणारे ग्राहक काही नव्या उत्पादनांची खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर नोटबुकला पर्याय म्हणून ग्राहक अल्ट्रा मोबाइल्स व अतिरिक्त उपकरण म्हणून टॅब्लेट्सच्या पर्यायाकडे वळू शकतात. गार्टनरच्या मते, बाजारातील शक्ती ग्राहकांकडे परावर्तित होत असून उत्पादनांच्या किमती आता प्राथमिक वेगळेपणा ठरताहेत.

लक्षणीय बाबी
०जास्त किमतीच्या महागड्या प्रीमियम मोबाइल हँडसेटच्या मागणीत घट.
०विकसित देशांतील बाजारपेठांत मध्यम श्रेणीच्या हँडसेट खरेदीकडे ग्राहकांचा कल.
०विकसनशील देशांतील बाजारपेठांत स्वस्त परंतु जास्त सुविधा असणार्‍या अँड्रॉइड हँडसेटला ग्राहकांकडून प्राधान्य. ०उत्पादनाची कमी किंमत ठरणारे बाजारातील वेगळेपण.

X