आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - झपाट्याने होत असलेले शहरीकरण, ग्राहकांच्या क्रयशक्तीत झालेली वाढ आणि अर्थव्यवस्थेला मिळत असलेली संजीवनी या गोष्टी लक्षात घेतल्या तर पुढील तीन वर्षांत रंग उद्योगाची उलाढाल 50 हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता इंडियन पेंट असोसिएशन या संस्थेने व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावल्या तरी इंधन दरवाढ व उत्पादन खर्च कमी होणार नसल्याने त्याची झळ रंगालाही बसणार आहे. आगामी काळात रंगाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गेल्या काही वर्षांपासून रंग उद्योगाची घसरण सुरू होती, परंतु वाढत्या शहरीकरणाने या उद्योगाला नवीन उभारी मिळाली असून पुढील तीन वर्षांत या उद्योगाची चांगली वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2016 पर्यंत या उद्योगाची उलाढाल 49,545 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता इंडियन पेंट असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत अकुला यांनी व्यक्त केली.
आर्थिक वर्ष 2012 मध्ये रंग उद्योगाने 26,040 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. त्यामध्ये डेकोरेटिव्ह रंगांचा वाटा जवळपास 71 टक्के म्हणजे 18,490 कोटी रुपयांचा, तर उर्वरित 7,550 कोटी रुपयांचा वाटा औद्योगिक रंग विभागाचा आहे. संख्यात्मक स्वरूपात 3.11 दशलक्ष टन रंगांची विक्री झाली असून हा वाटा 77 टक्के आहे.
डेकोरेटिव्ह, इंडस्ट्रियल रंगांना मागणी
शहरीकरणाचे वाढते प्रमाण आणि क्रयशक्तीत झालेली वाढ यामुळे भविष्यात डेकोरेटिव्ह आणि इंडस्ट्रियल पेंट्सची मागणी वाढून त्याचे प्रमाण 70 : 30 असे राहील. येणार्या वर्षात रिअल इस्टेट क्षेत्राची चांगली वाढ होऊनदेखील रंगांच्या मागणीला चालना मिळेल, असा आशावाद अकुला यांनी व्यक्त केला.
रंग महागणार
कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावल्या असल्या तरी उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता कमी आहे. कारण रुपयाचे अवमूल्यन आणि महागाई याचा उत्पादन खर्चावर ताण पडत आहे. गेल्या तीन वर्षांत रंगांच्या किमतीत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण सध्याचा कल जर असाच कायम राहिला तर नजीकच्या काळात रंगांच्या किमती वाढण्याचा अंदाज एशियन पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक केबीएस आनंद यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.